शिक्रापूर – येथील पुणे – नगर महामार्गालगत बजरंगवाडी येथे एका तृतीयपंथीचा धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याची घटना घडली. यामुळे शिक्रापूर परिसरात खळबळ उडाली आहे. आशु ऊर्फ आनिश रामानंद यादव (वय 32, रा. बजरंगवाडी, शिक्रापूर ता. शिरूर) असे मृत तृतीयपंथीचे नाव आहे. याबाबत अनिता सोमनाथ सासवडे (रा. बजरंगवाडी, शिक्रापूर ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. त्यानुसार शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना जेरबंद करण्यात आले आहे.
बजरंगवाडी येथे पुणे-नगर रस्त्याच्या कडेला असेलल्या मोकळ्या जागेमध्ये रविवारी (दि. 12) सकाळच्या सुमारास एका महिलेचा मृतदेह पडल्याचे नागरिकांना दिसून आले. मात्र त्याठिकाणी पाहणी केली असता मृत शरीरावर मोठ्या प्रमाणात वार केल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दरम्यान या ठिकाणच्या मोकळ्या मैदानात या तृतीयपंथीवर धारदार हत्यारांनी वार करीत वेगवेगळ्या जागी ओढत नेल्याचे दिसून आले.
यावेळी सदर व्यक्ती तृतीयपंथी असल्याचे समोर आले. यानंतर खुनाचा तपास करीत असताना यातील आरोपींची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकास मिळाली. त्यानुसार त्यांनी बजरंगवाडी परिसरात जात धर्मू जोहितराम ठाकूर (वय 20) व युगुल लालसिंग ठाकूर (वय 19, दोघे रा. बजरंगवाडी शिक्रापूर ता. शिरूर, मूळ रा. ढाबा ता. डोंगरगाव जि. राजनंदगाव छत्तीसगड) या दोघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान त्यांच्याकडे चौकशी केली असता त्या दोघांनी खुनाची कबुली दिली. आशु ही तृतीयपंथी दररोज रस्त्याने जाताना त्रास देत पैशांची देखील मागणी करीत होती. त्यामुळे आम्ही तिचा खून केला असल्याची कबुली दिली. तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे करीत आहेत.