पिंपरी – मोशीतील बोऱ्हाडेवाडी विनायकनगर येथे छत्रपती संभाजी महाराज व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 32 कोटी 65 लाख रुपये आणि विविध विकासकामांसाठी येणाऱ्या 39 कोटी 46 लाख रुपये खर्चास महापालिका स्थायी समितीने मान्यता दिली.
स्थायी समितीची सभा नुकतीच पार पडली. संतोष लोंढे अध्यक्षस्थानी होते. जलशुद्धीकरण केंद्र सेक्टर 23 येथील टप्प एक फिल्टर बेडची वाळू बदलणे, सुरक्षा आवरण करणे त्यासाठी 1 कोटी 72 लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली. तसेच क्रांतीवीर चाफेकर स्मारक समिती यांना बांधकाम परवानगीसाठी येणारे 27 लाख 46 हजार विकास शुल्क माफ करण्यास मंजुरी देण्यात आली.
विविध ठिकाणच्या पाण्याच्या टाक्यांच्या दुरुस्तीसाठी 75 लाख 95 हजार रुपये मंजूर करण्यात आले. त्यामध्ये भोसरी गावठाण, आश्रम शाळा, शांतीनगर व संत तुकारामनगर परिक्षेत्रातील पाण्याच्या टाक्यांचा समावेश आहे. बोपखेल परिक्षेत्रातील पाण्याच्या टाकीच्या दुरुस्तीसाठी 59 लाख 13 हजार रुपये मंजूर करण्यात आले. तर भोसरी उपविभाग अंतर्गत विविध ठिकाणी जलवाहिनी टाकण्यासाठी 52 लाख 34 हजार रुपये, प्रभाग 11 कृष्णानगर, शिवतेजनगर परिसरातील चेंबर व सांडपाणी वाहिनी आवश्यकतेनुसार देखभाल व दुरुस्तीसाठी 28 लाख 99 हजार रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली.