‘वृक्षसंवर्धन’चे 32 कोटींचे अंदाजपत्रक स्थायीकडे

पिंपरी-चिंचवड महापालिका : मागील वर्षीच्या तुलनेत चार कोटींची वाढ

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका वृक्षसंवर्धन विभागाचा सन 2020-21 या आर्थिक वर्षाचा 32 कोटी 3 लाख रुपयांचा मूळ अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर सादर झाला आहे. मागील वर्षीपेक्षा यावर्षीच्या अर्थसंकल्पाच्या अंदाजित रक्‍कमेत 4 कोटी रुपयांची वाढ झाली असून स्थायी समितीच्या मान्यतेनंतर हा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र नागरी क्षेत्रे झाडांचे संरक्षण व जतन करणे अधिनियमांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका वृक्ष संवर्धन विभागाने सन 2020-21 चा वार्षिक अर्थसंकल्प तयार केला आहे. या अर्थसंकल्पात सन 2019-20 च्या सहा महिन्यातील प्रत्यक्ष जमा – खर्चाच्या तसेच सहा महिन्याच्या जमा- खर्चाची अंदाजे रक्कम नमूद केली आहे. त्यानुसार, सन 2019-20 चा सुधारित 28 कोटी 67 लाख 16 हजार रुपये आणि सन 2020-21 चे मूळ 32 कोटी 3 लाख 81 हजार रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर मांडला आहे.

आगामी वर्षात वृक्षसंवर्धन समितीकडे 7 कोटी 50 लाख रुपयांचा वृक्षकर, तर बॅंक व्याजातून 4 कोटी, वृक्ष अनामत रकमेतून 11 कोटी आणि रोपे विक्रीतून 2 लाख रुपये जमा होईल, असा अंदाज आहे. सहजासहजी मिळणाऱ्या या रक्‍कमेमुळे आगामी वर्षाचा अर्थसंकल्प 32 कोटी 3 लाख 81 हजार रुपयांवर पोहोचला आहे.

या अर्थसंकल्पात नर्सरी साहित्य देखभाल-दुरुस्ती (8 लाख), फळाफुलांचे प्रदर्शन (30 लाख), झाडांचे पुनर्रोपण (40 लाख), खड्डे खोदाई (2 कोटी), वृक्ष प्राधिकरण सदस्यांचा दौरा (30 लाख), नामफलक खरेदी व दुरुस्ती (10 लाख), पिंजरे दुरुस्ती (25 लाख), वृक्ष गणना (2 कोटी 50 लाख), ताराकुंपण देखभाल – दुरुस्ती (50 लाख), पिंजरे खरेदी (60 लाख), झाडे रोपे व बियाणे खरेदी (2 कोटी), वृक्षसंवर्धन विभागाची विविध कामे करणे (1 कोटी), ठेकेदारी पद्धतीने वृक्षसंवर्धन (1 कोटी), पाणीपुरवठा विषयक कामे (1 कोटी), दुर्गादेवी उद्यान देखभाल (75 लाख), गायरान आणि मोकळया जागांवर वृक्षारोपण करणे (1 कोटी), गायरान आणि मोकळया जागांअंतर्गत रस्ते करून वृक्षारोपण करणे (3 कोटी), वृक्षरोपण-संवर्धन (5 कोटी), बेंचेस खरेदी (25 लाख) आणि रस्ते सुशोभीकरण (4 कोटी) या कामांचा समावेश आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.