400 घरांच्या ‘एसआरए’मध्ये करोनाचा कहर
पुणे – भवानी पेठ येथील एका “एसआरए’ अर्थात झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील 400 घरांच्या इमारतीत करोनाचा शिरकाव झाला आहे. गेल्या दोन दिवसांत या इमारतीत तब्बल 32 जणांना करोनाची लागण झाली आहे. तर, हा आकडा 200च्या घरात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणच्या एका महिलेमुळे हा करोनाचा प्रसार झाल्याचे समोर आले आहे.
या इमारतीमधील 200 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, याच ठिकाणी असलेल्या दोन इमारतींमधील बाधितांसाठी विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. तर ही संपूर्ण इमारतच सील करण्यात आली आहे. आधीच भवानीपेठ करोनाचा हॉटस्पॉट झालेला असताना; ही बाब समोर आल्याने सर्वच उपाययोजनांना सुरूंग लागला आहे.
भवानी पेठेत या “एसआरए’ योजनेतील आठपैकी सहा इमारतींमध्ये नागरिकांचे वास्तव्य आहे. त्यातील एका इमारतीमधील महिला पुणे स्टेशन परिसरातील एका खासगी रुग्णालयात आया म्हणून काम करत होती. हॉटस्पॉट भागात असतानाही ही महिला दररोज कामावर जात होती. त्यानंतर मागील काही दिवसांत करोनासदृश लक्षणे दिसत असल्याने तिने करोनाची तपासणी केली होती. त्यात, तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र, या इमारतीत दाटीवाटीत राहत असलेल्या अनेकांना या महिलेच्या संपर्कातून करोनाची बाधा झाल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, ही माहिती मिळताच, गुरुवारी या इमारतीमधील तब्बल 200 संशयितांचे स्वॅब त्याच ठिकाणी जाऊन घेण्यात आले. त्यात, आतापर्यंत 32 जणांना बाधा झाली असून अद्यापही 100 जणांचे अहवाल आलेले नाहीत.
सोसायटी सील
या करोना संसर्गाची माहिती मिळताच महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह या भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी असलेले साखर आयुक्त सौरभ राव यांनी या सोसायटीची पाहणी करत ही सोसायटी सील केली आहे. तर येथील संशयितांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना याच परिसरात असलेल्या “एसआरए’च्या इतर दोन इमारतींत हलविण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार तसेच विलगीकरण करण्यात येणार असल्याचे महापौर मोहोळ यांनी सांगितले. येथे आवश्यक सर्व वैद्यकीय सुविधा दिल्याचे त्यांनी सांगितले.