नवी दिल्ली: राष्ट्रीय महिला आयोगाकडे (एनसीडब्ल्यू) लॉकडाऊन दरम्यान घरगुती हिंसाचाराच्या 315 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींमध्ये शारीरिक छळ करणे, सासरच्या लोकांचा छळ , बळजबदस्तीने लग्न आदी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. आयोगाच्या आकडेवारीनुसार 315 तक्रारी ऑनलाईन आणि व्हाट्सएप वर आल्या आहेत. मागील महिन्यात पोस्टद्वारे एकही तक्रार आली नाही. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यापासून आयोगाकडे तक्रारींचे प्रमाण जास्त असल्याचं आयोगानं सांगितलं आहे.
राष्ट्रीय महिलाआयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा म्हणाल्या की, 25 मार्चपासून लादलेल्या लोकडाऊनमुळेच महिला हिंसाचारात वाढ झाली आहे. घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणांची माहिती देण्यासाठी आयोगाने एक व्हाट्सएप क्रमांक (7217735372) जारी केला आहे. लॉकडाऊन कालावधीत घरगुती हिंसाचाराच्या तक्रारींच्या काही घटना आयोगाने सामायिक केल्या आहेत. यापैकी एका घटनेत एका मुलीने तक्रार केली आहे की, तिच्या पालकांनी लग्नासाठी दबाव आणत असताना तिला मारहाण केली आहे.
या तक्रारीनंतर आयोगाने पोलिसांशी संपर्क साधून तिला निवारण गृहात पाठवले आहे.
दुसर्या एका घटनेत त्रिपुरा येथील एका व्यक्तीने तक्रार केली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे कि, तिच्या बहिणीवर तिच्या सासरच्या लोकांनी अत्याचार केला आहे. लॉकडाऊनमुळे आम्हाला तिची मदत करता येत नाही. या तक्रारी नंतर आयोगाच्या सदस्याने सांगितले की, “आम्ही पोलिसांशी संपर्क साधून संबंधित मुलीला वाचवले आहे.”
आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार महिला हिंसाचाराच्या एकूण 800 तक्रारी आल्या आहेत. त्यापैकी सुमारे 40 टक्के तक्रारी या घरगुती हिंसाचाराच्या आहेत. तर एप्रिल महिण्यात सायबर हिंसाचाराच्या तक्रारीत सुद्धा वाढ झाल्याचे आयोगानं स्पष्ट केलं आहे. आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार एप्रिलमध्ये सायबर क्राईमच्या 54 सायबर तक्रारी (ऑनलाईन) प्राप्त झाल्या आहेत. तर, मार्च महिन्यात 37 ऑनलाईन तक्रारी आयोगाकडे प्राप्त झाल्या होत्या. तसेच फेब्रुवारी महिन्यात 21 तक्रारी ऑनलाईन आणि काही पोस्टद्वारे आयोगाकडे दाखल झाल्या होत्या.
एप्रिलच्या सुरुवातीला लॉकडाऊनमुळे वाढीव घरगुती हिंसाचाराच्या घटनांवर राष्ट्रीय महिला आयोगाने चिंता व्यक्त केली होती. मार्चच्या पहिल्या आठवड्यात एनसीडब्ल्यूला देशभरातील महिलांवरील गुन्ह्यांच्या 116 तक्रारी आल्या आहेत. परंतु लॉकडाऊन दरम्यान, घरगुती हिंसाचाराच्या तक्रारीत 23 ते 31 मार्च पर्यंत 257 ने वाढ झाली आहे. याशिवाय जगभरातील लॉकडाऊन दरम्यान वाढत्या घरगुती हिंसाचाराच्या घटनांवरही संयुक्त राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली होती. युनायटेड नेशन्सचे सरचिटणीस अँटोनियो गुतारारेस यांनी या परिस्थितीत महिला व मुलींवरील देशांतर्गत होणा-या हिंसाचारातील वाढीवर चिंता व्यक्त करत सरकारांकडून ठोस कारवाईची मागणी केली.