कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने कार्यवाही
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गेल्याच महिन्यात सेटचा निकाल जाहीर केला. मात्र, कागदपत्रांची पूर्तताअभावी 314 विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवले आहेत. संबंधित विद्यार्थ्यांनी कागदपत्र तातडीने सादर केल्यास त्यांना ऑनलाइन सर्टिफिकेट प्राप्त करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या सेट विभागाकडून देण्यात आली. साडेपाच हजार विद्यार्थ्यांपैकी 4 हजार विद्यार्थ्यांनी सेट परीक्षा उत्तीर्णाचे ऑनलाइन प्रमाणपत्र डाऊनलोड करून घेतले आहेत.
पुणे विद्यापीठामार्फत महाराष्ट्र व गोवा या राज्यांत 23 जून रोजी सेट परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल 12 ऑक्टोबर रोजी जाहीर झाला.
या परीक्षेत 5 हजार 415 विद्यार्थी उर्त्तीर्ण ठरले असून, निकालाची टक्केवारी 6.8 इतकी आहे. निकालात उत्तीर्ण ठरलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन सर्टिफिकेट मिळण्यासाठी सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाते. त्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी निकाल लागल्यानंतर एक महिन्याच्या कालावधीत सर्व कागदपत्र सेट विभागाकडे प्रत्यक्ष सादर करणे आवश्यक आहे. या कागदपत्रांची तपासणी केली जाते. त्यात कागदपत्रांची पूर्तता केलेल्या विद्यार्थ्यांना त्वरित सेट विभागाकडून “एसएमएस आणि ई-मेल’ केला जातो. त्यानंतर संकेतस्थळावरून ई-सर्टिफिकेट प्राप्त करून घेता येईल.
दरम्यान, उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांच्या पडताळणी केली असता 314 विद्यार्थ्यांच्या कागदपत्रे अपूर्ण असल्याचे समोर आले आहे. त्यात ज्या आर्थिक वर्षात सेटची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, त्याच वर्षाचा नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र देणे अपेक्षित आहे.
मात्र, काही विद्यार्थ्यांनी चुकीचे प्रमाणपत्र सादर केले आहेत. एवढेच नव्हे, काही विद्यार्थ्यांनी जातीचा उल्लेखही चुकीचा नोंदविला आहे. विद्यार्थ्यांनी तातडीने कागदपत्रांची पूर्तता केली तरच त्यांना उत्तीर्ण प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले जातील, अशी माहिती सेट विभागाचे समन्वयक डॉ. बी. पी. कापडणीस यांनी दिली.
785 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पूर्ण करण्यास संधी
सेटच्या निकालात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकत असलेले 785 विद्यार्थी सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. सेट परीक्षेसाठी पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण होणे आवश्यक आहे. मात्र, त्यापूर्वीच सेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांत उर्वरित शिक्षण पूर्ण करण्यासाठी संधी दिली जाते. या सर्व विद्यार्थ्यांनी दोन वर्षांत शिक्षण पूर्ण केल्यानंतरच त्यांना सेट उत्तीर्ण प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
381 विद्यार्थ्यांनी कागदपत्रेच सादर केली नाहीत
सेट निकाल लागताच पात्र विद्यार्थ्यांनी एक महिन्यात कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. अद्यापपर्यंत 381 विद्यार्थ्यांनी कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे त्यांना सेट परीक्षा उत्तीर्ण होऊनही प्रमाणपत्र देता येणार नाही. अशा विद्यार्थ्यांना कागदपत्रे सादर केल्यानंतर सेट परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र प्राप्त करता येणार आहे.