नवी दिल्ली – मणिपूरमधील समस्येचे मूळ कारण असलेल्या सीमेवरील घुसखोरीला आळा घालण्यासाठी ३० किलोमीटरवरच्या सीमेवर कुंपण घातले जाते आहे. शस्त्रास्त्रे, दारुगोळा आणि अमली पदार्थांच्या तस्करीला रोखण्यासाठी भारत आणि म्यानमार दरम्यानच्या संपूर्ण १,६४३ किलोमीटरच्या सीमेवर कुंपण घालण्यात येणार आहे. यासाठी ३१ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीने म्यानमार सीमेवरील या कुंपणाच्या खर्चाला मान्यता दिली आहे. मोरेहजवळ सुमारे १० किमी कुंपण घालण्याचे काम आधीच पूर्ण झाले आहे आणि मणिपूरच्या इतर भागात सीमेवर आणखी २१ किलोमीटरवर कुंपण घालण्याचे काम सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
भारत-म्यानमार दरम्यानची सीमा मणिपूर, मिझोराम, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशमधून जाते. केंद्र सरकारने आधीच भारत-म्यानमार फ्री मूव्हमेंट रेजिम रद्द केले आहे. याअंतर्गत सीमेजवळ राहणाऱ्या लोकांना कोणत्याही कागदपत्रांशिवाय एकमेकांच्या प्रदेशात १६ किमी पर्यंत प्रवेश करण्यास परवानगी दिली जात होती. भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणाचा भाग म्हणून २०१८ मध्ये या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली. गृहमंत्री अमित शहा यांच्या देखरेखीखाली मणिपूरमधील सुरक्षा व्यवस्थेचा नियमित आढावा घातला जातो आहे आणि आवश्यक त्या उपाय योजना देखील केल्या जात आहेत. केंद्रीय राखील दलाच्या दोन बटालियन यापूर्वीच मणिपूरमध्ये तैनात केल्या गेल्या आहेत.
याशिवाय केंद्रीय पोलीस दलांच्या २०० कंपन्या सीमाभागातल्या प्रांतांमध्ये तैनात केल्या गेल्या आहेत. मणिपूर सरकारच्यावतीने राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये फिरती विक्री केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. आवश्यक वस्तूंच्या उपलब्धतेसाठी केंद्रीय पोलीस कल्याण भांडारचीही सुरुवात करण्यात आली आहे, असे सूत्रांनी सांगितले.