चंदिगड – स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे माहेरघर ठरलेल्या राजस्थानच्या कोटा जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या 800 हून अधिक विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी हरियाणा सरकारने राज्य परिवहन महामंडळाच्या 31 बस पाठविल्या आहेत. हरियाणाचे परिवहनमंत्री मूलचंद शर्मा यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्यासाठी हरियाणातील 800 हून अधिक विद्यार्थी कोटा येथे कोचिंगनिमित्त वास्तव्यास होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हे विद्यार्थी तेथेच अडकून पडले होते. त्यांना घरी परत आणण्याचा निर्णय हरियाणा सरकारने घेतला असून, त्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या 31 बस पाठविण्यात आल्या आहेत.
दरम्यान, कोटा शहरात उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडसह देशभरातील इतर राज्यांमधून हजारो विद्यार्थी मेडिकल आणि इंजिनिअरिंग विषयांच्या कोचिंगसाठी येत असतात. तिथे 25 मार्चपासून विविध राज्यातील 7500 विद्यार्थी अडकले होते. त्यामधील काही विद्यार्थ्यांची संबंधित राज्यांनी सुटका केली आहे. तर अजूनही हजारो विद्यार्थी तिथे अडकून पडले आहेत.