300 पाणी मीटर नागरिकांनी काढले

चोवीस तास समान पाणीपुरवठा योजनेचे भविष्य अंधारात

पुणे – चोवीस तास पाणीपुरवठा योजनेंतर्गत धानोरी, गणेशनगर परिसरात बसवण्यात आलेले जवळपास 300 पाणी मीटर नागरिकांनी काढून टाकले आहेत. हे मीटर कोणाच्या सांगण्यावरून काढले आहेत. याचा शोध महापालिका प्रशासन घेत आहे. यामुळे या योजनेचे भविष्य अंधकारमय झाले आहे. दरम्यान, मीटर काढल्या प्रकरणाचा तपशील गोळा करून लवकरच संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या योजनेंतर्गत टाक्‍यांचे काम बऱ्यापैकी प्रगतिपथावर आहे, तर काही भागांत पाइपलाइनच्या कामाला सुरुवात झाली आहे. तसेच घरोघरी पाण्याचे मीटरही बसवण्यात येत आहेत. पाणीवाटपाच्या विभागानुसार धानोरी, गणेशनगर परिसरात एका विभागात सुमारे साडेचार हजार आधुनिक मीटर बसवले आहेत. जोपर्यंत सर्व योजनेचे काम पूर्ण होऊन कार्यान्वित होत नाही तोपर्यंत मीटरद्वारे घेण्यात येणाऱ्या पाण्याचे बिल आकारण्यात येणार नाही, अशीच ही योजना आहे.

असे असताना नागरिकांमध्ये मीटरची भीती निर्माण करून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मीटर काढून टाकण्यासाठी नागरिकांना उद्युक्‍त केले जात आहे. त्यामुळे धानोरी, गणेशनगरमधील जवळपास 300 नागरिकांनी मीटर काढून घरात ठेवले आहेत.

पोलिसांत गुन्हा दाखल होणार
शहरात सुमारे 3 लाख मीटर बसवण्यात येणार आहेत. जर सर्वच भागांत नागरिकांनी ही पद्धत अवलंबल्यास शहरातील पाणी वापराचे आणि गळतीचे ऑडिटच करता येणार नाही. याचा परिणाम पाणी वाटपावर होणार असून शहरातील पाणी समस्या कायम राहणार आहे, असे पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचे मत आहे. दरम्यान, असा प्रकार झाल्याच्या वृत्ताला महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही. जी. कुलकर्णी यांनी दुजोरा दिला आहे. मीटर काढून ठेवल्याप्रकरणी तपशील गोळा करण्यात येत असून पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले

Leave A Reply

Your email address will not be published.