पश्‍चिम घाट ‘ऑर्किड’च्या 300 स्थानिक प्रजाती

पुणे -“जैवविविधतेने संपन्न असा पश्‍चिम घाट हा विविध प्राणी, पक्षी आणि वनस्पतींसाठी वरदान ठरत आहे. सर्वाधिक मागणी असलेल्या फुलांपैकी एक असलेले “ऑर्किड’ या वनस्पतींच्या स्थानिक प्रजातींसाठी हॉटस्पॉट ठरत असून देशात आढळणाऱ्या एकूण ऑर्किड प्रजातींपैकी 300 स्थानिक प्रजाती या पश्‍चिम घाटात आढळत असून त्यातील तब्बल 105 स्थानिक प्रजाती या महाराष्ट्रात आढळत असल्याचे नुकतेच एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

भारतीय वनसर्वेक्षण संस्था म्हणजेच बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया (बीएसआय) या संस्थेतर्फे नुकतेच देशातील ऑर्किड वनस्पतीवर आधारित एक चित्ररूपी सर्वेक्षण प्रसिद्ध करण्यात आले आहे. या सर्वेक्षणानुसार भारतात ऑर्किड या वनस्पतीच्या तब्बल 1,256 प्रजाती आढळतात. यापैकी 388 प्रजाती या स्थानिक स्वरुपाच्या असून त्या केवळ भारतातच आढळतात. यापैकी सुमारे 111 प्रजाती या पश्‍चिम घाटात आढळतात. त्यातील तब्बल 105 स्थानिक प्रजाती या महाराष्ट्रात आढळतात. तामिळनाडू आणि केरळ राज्यातही ऑर्किडच्या स्थानिक प्रजाती आढळतात असे या सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे. सर्वेक्षणानुसार, भारतात अरूणाचल प्रदेशात सर्वाधिक म्हणजेच 612, सिक्‍कीममध्ये 560 तर पश्‍चिम बंगाल आणि दार्जिंलिंग प्रदेशात 479 ऑर्किड वनस्पतीच्या प्रजाती आढळतात. तर पश्‍चिम घाटात सर्वाधिक स्थानिक प्रजाती आढळतात.

ऑर्किडबाबत जागरूकता निर्माण होणे आवश्‍यक
बीएसाआयच्या पश्‍चिम विभागीय कार्यालयातील वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. जीवन जलाल म्हणाले, ‘पश्‍चिम घाटात विशेषत: महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ऑर्किड वनस्पती आढळतात. ही वनस्पती धोकादायक परिस्थितीतील वनस्पती या प्रकारात समाविष्ट असून तिच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी संस्थेकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याच अंतर्गत देशभरातील ऑर्किड वनस्पतीचा गेला 4 वर्षांपासून अभ्यास सुरू असून त्याअंतर्गत ही माहिती समोर आली आहे. ऑर्किड ही एक महत्त्वपूर्ण वनस्पती असून तिच्याबाबत जागरूकता निर्माण होणे आवश्‍यक आहे.’

Leave A Reply

Your email address will not be published.