विश्‍वास ठेवा : एकाच झाडावर त्याने केलीत आंब्याची 300 कलमे

लखनौजवळील प्रगतीशील शेतकऱ्याची करामत

लखनौ – आपण प्रगतीशील शेतकरी हा शब्द अगदी सहजच वापरत असतो. मात्र, फारसा शिकलेला नसूनही आपली कल्पकता आणि अपार मेहनत याच्या जोरावर एखादा खेडूत शेतकरी काय उभे करु शकतो त्याचे उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौजवळील 80 वर्षीय कलीमुल्ला खान होय. या गृहस्थाने त्याच्या रोपवाटीकेत एकाच आंब्याच्या झाडावर तब्बल 300 कलमे करुन जागतिक विक्रमच केला आहे, असे नव्हे तर शेतीमधील एक चमत्कार घडवला आहे.

लखनौजवळ एका रोपवाटिकेत हे आंब्याचे उंच झाड उभे आहे. येथे रोपवाटिकेला भेट द्यायला येणाऱ्या प्रत्येकाला खानसाहेब सर्वच्या सर्व 300 आंब्यांच्या जातींची माहिती देतात. या झाडावरील प्रत्येक फांदीवर उगवणारा वेगळा आंबा हा चर्चेचा विषय झाला असून या प्रत्येक आंब्याला खानसाहेबांनी त्याच्या माहितीचे लेबलही लावले आहे. पश्‍चिम बंगालमधील हिमसागर आंबा, बिहारमधील लांग्रा आंबा आणि अर्थातच बहुमोल अल्फोन्सो आंबा म्हणजेच आपला देवगड हापूस, ज्याचा गोड, मलईदार, केशरी रंगाच्या पल्पला स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वात जास्त मागणीला आहे.

खानसाहेबांच्या प्रसिद्ध आंब्याच्या झाडाचे प्रमुख तीन प्रकार असून त्यात फ्लोरिडामध्ये लोकप्रिय झालेला टॉमी ऍटकिन्स आंबा, सोन्याचा पट्टा असलेला सुवर्णरेखा आंबा आणि हसन-ए-आरा म्हणजे सौंदर्याने सुशोभित केलेला आंबा. खान यांचे आंबा शेत मलिहाबाद येथे आहे. हा एक मोठा आंबा लागवडीचा पट्टा आहे आणि आंबा-प्रेमीचे नंदनवन आहे. भारत हा जगातील आंबा उत्पादित करणारा सर्वात मोठा उत्पादक देश बनला आहे. यामध्ये 1000 हून अधिक जाती वाढतात आणि 40 टक्के पेक्षा जास्त उत्पादन होते.

वर्ष 1900 मध्ये कलीमुल्ला खान यांच्या आजोबांनी त्यांच्या 22 एकर शेतात आंबा लागवड सुरु केली. आता स्वत: कलीमुल्ला खान त्यांच्या मुलाच्या मदतीने ही आमराई सांभाळतात. त्यावेळी फक्त दोन स्थानिक जातींचा आंबा असायचा. मात्र आंबा कलम करण्याच्या त्यांच्या आवडीचे बीज वयाच्या 15 व्या वर्षी पेरले गेले, जेव्हा कलीमुल्ला खानने एका मित्राच्या बागेत क्रॉसब्रेड गुलाब पाहिले आणि गुलाबाच्या झाडावर वेगवेगळ्या रंगांची फुले उगवलेली होती. त्यावरुन आंब्याच्या एका झाडाला निरनिराळ्या प्रकारची फळे मिळू शकतात, का याबद्दल त्यांनी विचार सुरु केला.

एका झाडावर जेव्हा त्यांनी आंबाच्या सात प्रकारांची कलम केली तेव्हा ते 17 वर्षांचे होते. मग त्यांनी आंब्याच्या कलमांबद्दल अधिक जाणून घेण्याचा निश्‍चय केला.दुर्मिळ जाती शोधण्यासाठी त्यांनी देशभरातून नमुने गोळा केले. खान म्हणतात की झाडाला आता 300 पेक्षा जास्त प्रकारचे आंबे लागतात. त्याला ते अल मुकरार किंवा रिझोल्यूशन म्हणतात. हे चमत्कारी झाड फक्त एक झाड नाही तर ते स्वतःच एक बाग आहे, एक विश्‍व आहे.

खान नामांकित व्यक्ती असून त्यांनी “पद्मश्री’सह अनेक पुरस्कार मिळवले आहेत. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणातल्या एका आंब्याच्या झाडावर त्यांनी 54 कलमे करुन दाखवली आहेत. शिवाय त्यांच्या या कार्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये केली गेली आहे. त्यांनी कलमांची कला शिकवण्यासाठी दुबई आणि इराणला भेट दिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.