तात्पुरत्या रुग्णालयासाठी परिचारिकांसह अन्य स्टाफही आवश्यक
पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात करोनाचा संसर्ग वाढल्यास पूर्वतयारी म्हणून बालेवाडी येथे 1 हजार खाटांचे तात्पुरते रुग्णालय उभारले जात आहे. यासाठी 300 डॉक्टरांची गरज आहे. याशिवाय तितक्याच परिचारिका आणि अन्य स्टाफचीही आवश्यकता आहे. हे मनुष्यबळ पुरवण्यासंदर्भात राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली आहे.
करोना बाधितांची वाढती संख्या पाहता अंदाज घेऊन महापालिका तयारी करत आहे. त्यासाठी बालेवाडी येथे हे रुग्णालय उभारले जात आहे. राज्य सरकारकडून डॉक्टर आणि परिचारिका यांची टीम आल्यानंतर बालेवाडी येथील रुग्णालय सुरू करता येणार आहे.
सध्या महापालिकेकडे 7 हजार खाटांची क्षमता आहे. सध्या शहरामध्ये केवळ 2,279 रुग्ण हे प्रत्यक्षात उपचार घेत आहेत. त्यामुळे यापुढील काळात रुग्णसंख्या वाढली, तरी पुरेशा खाटांची क्षमता आहे. “आयसीएमआर’ यांनी नुकतीच सुधारित मार्गदर्शक तत्वे आणि नियम सर्व राज्यांना पाठवले आहेत. त्यानुसार बाधित रुग्णाला कोणतेही लक्षणे 10 दिवसांनंतर आढळली नाहीत तर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. लक्षणे नसतील, तर त्यांना घरीच विलग केले जात आहे. याची अंमलबजावणी महापालिकादेखील लवकरच सुरू करणार आहे.
शहरामध्ये आतापर्यंत सापडलेल्यांपैकी 65 टक्के रुग्णांना कोणतही लक्षणे नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा रुग्णांना वेगळे ठेवण्यात येणार आहे. असे झाल्यास महापालिका प्रशासनावरचा ताण कमी होणार आहे. दहा दिवसानंतर रुग्णाला कोणतीही चाचणी न करता सोडण्यात येत आहे.
व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन पुरवठा यंत्रणेची गरज
महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये फार कमी प्रमाणात व्हेंटिलेटर्स आहेत. शहरामध्ये 500 ते 600 च्या दरम्यान व्हेंटिलेटर असल्यामुळे भविष्यात रुग्णाची संख्या वाढल्यास व्हेंटिलेटरची आवश्यकता भासणार आहे. शिवाय ऑक्सिजन पुरवठा यंत्रणेची गरज आहे. त्यामुळे याची उपलब्धता तातडीने होणे आवश्यक आहे.