बर्लिन – बर्लिनची भिंत पाडल्याला 30 वर्ष झाल्यानिमित्त जर्मनीमधे आज विशेष कार्यक्रम होत आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीचे विभाजन होऊन, ही भिंत बांधण्यात आली होती. शीत युद्धाचे प्रतीक मानली गेलेली ही भिंत 1989 मधे पाडून पूर्व आणि पश्चिम जर्मनीचे एकीकरण झाले.
काल या निमित्त झालेल्या विशेष कार्यक्रमात जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्कल यांच्यासोबतच पोलंड, झेक प्रजासत्ताक, स्लोव्हाकिया आणि हंगेरी या देशांचे प्रमुख सहभागी झाले होते. ही भिंत ओलांडून जाण्याचा प्रयत्न करताना, मृत्युमुखी पडलेल्यांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली.
जर्मन अध्यक्ष फ्रॅंक-वॉल्टर स्टेनमीयर यांनी अमेरिकेला परस्पर आदरयुक्त भागीदार बनून राष्ट्रवादाला नकार द्या असे आवाहन केले. बर्लिनची भिंत पाडल्याच्या घटनेला 30 वर्षे पूर्ण होत असताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना उद्देशून हा टोला आहे. कम्युनिस्ट पूर्वेला भांडवलवादी पाश्चात्यापासून विभक्त करणारी द्वेषाची भिंत पाडण्यास मदत करणाऱ्या अमेरिकेच्या महत्त्वाच्या भूमिकेचे स्मरण स्टेनमीयर यांनी या निमित्ताने केले.