वाबळेवाडी शाळेच्या धर्तीवर होणार विकास : शिक्षकांचे पथक आज भेट देणार
नगर – पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेचा पट 38 वरून तब्बल 650 वर गेला आहे. ही किमया या शाळेने कशी साधली याची यशोगाधा नगर जिल्ह्यातील उपक्रमशील शाळांच्या शिक्षकांना दाखविण्यात येणार असून त्यातून सुपर 30 मॉडेल स्कूल योजनेतंर्गत नगर जिल्ह्यातील किमान 30 शाळा वाबळेवाडीच्या धर्तीवर विकसीत करण्याचा संकल्प नगर जिल्हा परिषदेने केला आहे.
नगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराजपाटील, शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे,उपशिक्षणाधिकारी अरूण धामणे व शिक्षण विभागातील अधिकारी-शिक्षकांनी या शाळेस नुकतीच भेट देवून पाहणी केली. या भेटीत त्यांना 5 वी शिष्यवृत्ती 100 टक्के निकाल व 34 विद्यार्थी गुणवत्ता प्राप्त,100 टक्के विद्यार्थी वाचन व गणिती क्रिया करतात,स्पर्धा परीक्षेची इ 1 ली पासून तयारी,विद्यार्थ्यांना आवडीचे विषय शिकण्याचे स्वातंत्र्य,शाळेच्या गरजा पालक व ग्रामस्थ लोकसहभागातून पूर्ण करतात अशा अनेक बाबी आढळून आल्या आहेत.
या धर्तीवर असे उपक्रम नगर जिल्ह्यातील शाळांमध्ये घेता येतील यासाठी शाळांची निवड करायची आहे. यासाठी जिल्ह्यातील 30 उपक्रमशील शाळा निवडण्यात येणार आहेत. प्रती तालुका किमान एक किंवा दोन शाळा अपेक्षित आहेत. आतापर्यंत एकूण 42 शाळांनी सहभागी होण्याची इच्छा दर्शविली आहे. या शाळेतील शिक्षकांची,शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य वा सरपंच शुक्रवारी,दि.17 वाबळेवाडी शाळेस भेट देणार आहे.