सोने खरेदीत 30 टक्‍क्‍यांची घट

‘लॉकडाऊन’चे साइड इफेक्‍ट : सोने पोहचले 53 हजारांवर

पिंपरी (प्रतिनिधी) – सोन्याचे भाव प्रति दहा ग्रॅमला 53 हजार 460 रुपयांवर जाऊन पोहचले आहेत. सोन्याच्या दागिन्यांऐवजी शुद्ध सोन्यातील कॉइन आणि वेढणी खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. त्याशिवाय, वाढलेल्या सोन्याच्या दराचा फायदा घेऊन वेढण्या मोडण्यावर देखील भर दिला जात आहे. लॉकडाऊनमुळे सोने-चांदीचे दागिने व अन्य खरेदीमध्ये 30 टक्के घट झाली आहे.

शेअर बाजार व चलन बाजारातील अस्थिरतेमुळे सोने आणि चांदीचे दर वेगाने वाढत आहेत. सोन्याच्या दरामध्ये गेल्या तीन महिन्यात 12 ते 15 हजार रुपयांची वाढ झाली आहे. तर, चांदीचा दर प्रति किलो 65 हजार 800 रुपयांपर्यंत जाऊन पोहचला आहे. सोन्याच्या 22 कॅरेटमधील दागिन्यांचा प्रति दहा ग्रॅमचा दर सध्या 50 हजार 970 रुपयांपर्यंत आहे. सोन्याचे दर आणखी वाढण्याच्या शक्‍यतेने दागिने खरेदीऐवजी प्रामुख्याने शुद्ध सोन्यातील कॉइन आणि वेढणी खरेदी केली जात आहे. कॉइन 24 कॅरेटमध्ये येते. तर, 23.5 कॅरेटमध्ये वेढणी येते. कॉइनचा दर प्रति दहा ग्रॅमला 53 हजार 460 तर, वेढणीचा दर प्रति दहा ग्रॅमला 52 हजार 910 रुपये इतका आहे. तसेच, वाढलेल्या दराचा फायदा घेण्यासाठी यापूर्वी कमी दरात केलेल्या वेढण्या मोडण्याकडे देखील बऱ्याच ग्राहकांचा सध्या कल आहे.

व्यवसायाला फटका

लॉकडाऊनमुळे यंदा सराफ व्यावसायिकांना चांगलाच फटका बसला आहे. याबाबत माहिती देताना सराफ व्यावसायिक संदीप महाजन म्हणाले, गेल्या वर्षभरात आम्ही 150 किलो सोने विकले होते. यंदा मात्र, त्या तुलनेत 30 टक्के विक्री कमी झाली आहे. सध्या दररोज सकाळी 9 ते 5 या वेळेत दुकाने उघडी आहेत. मात्र, वेळ कमी असल्याने त्याचाही परिणाम सोन्याच्या खरेदीवर होत आहे.

रक्षाबंधनानिमित्त राख्या

रक्षाबंधन सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सराफ व्यावसायिकांकडे 99 रुपयांपासून 350 रुपये किमतीपर्यंतच्या चांदीतील राख्या विक्रीसाठी आहेत. तर, 4 हजारांपासून दहा हजार रुपये किमतीपर्यंतच्या सोन्यातील राख्या विकल्या जात आहेत. खास रक्षाबंधनानिमित्त बहिणींसाठी चांदीचे पैंजण, जोडवी आदींची खरेदी केली जात आहे. त्याशिवाय, श्रावण महिना सुरू असल्याने चांदीमधील तामण, कलश आदींना देखील चांगली मागणी आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.