बीजिंग : चीनच्या अग्नेयेकडील सिचुआन प्रांतात दरडी कोसळल्यामुळे किमान ३० जण गाडले गेले आहेत. बचाव पथकाकडून या ठिकाणी मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. दरडी कोसळल्यामुळे किमान १० घरे देखील गाडली गेली असून शेकडो रहिवाशांना खबरदारी म्हणून अन्यत्र स्थलांतर करणे भाग पडले आहे.
आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाने जुनलियान कौंटीतल्या गावात मदत आणि बचावकार्यासाठी शेकडो कर्मचारी तैनात केले आहेत. दरडींच्या ढिगाऱ्याखालून दोघाजणांना जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. तर सुमारे २०० जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे, असे स्थानिक सरकारी वृत्तवाहिनीने म्हटले आहे.
गेल्या वर्षाच्या उत्तरार्धापासून दरडी कोसळण्याच्या अनेक घटना या ठिकाणी घडत आहेत. मोठ्या शिळा डोंगरावरून पडताना फटाक्यांसारखा मोठा आवाज होत असल्याचे स्थानिक गावकऱ्यांनी सांगितले. अध्यक्ष शी जिनपिंग यांनी या घटनेची दखल घेतली असून बेपत्ता असलेल्या सर्वांच्या शोधासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या गेल्या आहेत.
चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनी या ठिकाणच्या भूस्तर तपासणीचे आदेश दिले आहेत. पुन्हा अशी आपत्ती आल्यास जीवितहानी होऊ नये, यासाठी या परिसरातील नागरिकांनी त्वरित दुसरीकडे स्थलांतर करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
आपत्कालिन मदत आणि पुनर्वसन कार्यासाठी नॅशनल डेव्हलपमेंट ऍन्ड रिफॉर्म्स कमिशनने ५० दशलक्ष युआन (६.९ दशलक्ष डॉलर) ची तरतूद करण्यात आली आहे.