पुणे – कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील घोरपडी गावात करोनाबाधित रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णाचे नातेवाईक आणि आसपासच्या नागरिक, अशा एकूण 30 जणांना नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, बोर्ड प्रशासन सतर्क झाले असून, पूर्ण घोरपडी गाव सील करण्यात आले आहे.
दरम्यान, बोर्डाच्या आरोग्य विभागातर्फे परिसरातील 186 घरांमधील 600 नागरिकांची पाहणी पथकांच्या माध्यमातून करण्यात आली आहे, अशी माहिती बोर्डातर्फे देण्यात आली आहे. घोरपडी गावात नुकतेच करोना बाधित रुग्ण सापडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
मात्र, बोर्ड प्रशासनाच्या वतीने तातडीने पावले उचलण्यात आली आहेत. हा भाग पूर्णपणे सील करण्यात आला आहे. तसेच सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाच्या वतीने नेमण्यात आलेल्या पथकांच्या माध्यमातून 186 घरांमधील 600 नागरिकांची पाहणी करण्यात आली आहे. तसेच घोरपडी गावासह आसपासच्या परिसरात हायपोक्लोराइड औषध फवारणी करण्यात आली आहे, अशी माहिती बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार आणि पटेल रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड यांनी दिली.