करोना व्हायरस ः आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : करोना व्हायरसच्या दहशतीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहू. त्याच पार्श्वभूमीवर पुणे येथील नायडू मध्ये निरिक्षणाखाली असलेल्या चिनी प्रवाशासह आणखी 5 जणांचे करोनाचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्या 35 पैकी 30 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 18 हजार 84 प्रवासी तपासण्यात आले आहेत. आतापर्यंत राज्यात बाधित भागातून 140 प्रवासी आले आहेत. ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत 35 जणांना भरती करण्यात आले आहे. यामध्ये काल संध्याकाळी कस्तुरबा रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या मूळच्या केरळमधील आणि वुहान शहरात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 2 विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.
या दोघांना कोणतीही लक्षणे नसली तरी खबरदारी म्हणून त्यांना भरती करून प्रयोगशाळा तपासणी करण्यात येत आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्या 35 पैकी 30 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एनआयव्ही पुणे यांनी दिला आहे, असे टोपे यांनी सांगितले.
काल नायडू रुग्णालयात भरती करण्यात आलेला चिनी प्रवासीदेखील करोना आजाराकरिता निगेटिव्ह आढळला आहे. जिल्हा रुग्णालय, अहमदनगर येथे निरीक्षणाखाली असलेला प्रवासीही करोना करता निगेटिव्ह आढळला आहे. उरलेल्या 5 जणांचे अहवाल उद्यापर्यंत प्राप्त होतील. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण 140 प्रवाशांपैकी 57 प्रवाशांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.