मुंबई – दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) दिल्ली विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज 30 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
यामुध्ये 13 मुस्लिम चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. दिल्लीमध्ये आप विरुद्ध भाजप अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात भाजपसोबत सत्तेत असलेल्या अजित पवारांनी दिल्लीत भाजपच्याविरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडण्याआधी पक्षाची राष्ट्रीय मान्यता निवडणूक आयोगाने रद्द केली होती. महाराष्ट्राशिवाय इतर राज्यांमध्ये पक्षाचे आवश्यक खासदार आणि आपेक्षित मते नसल्यामुळे राष्ट्रवादीची राष्ट्रीय पक्षाची मान्यता रद्द करण्यात आली होती.
अजित पवारांनी शरद पवारांपासून वेगळे होत पक्षावर आणि चिन्हावर दावा केला होता. निवडणूक आयोगाने अजित पवार यांचा पक्षच खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचे जाहीर करुन त्यांना घड्याळ हे चिन्ह देखील दिले. त्यानंतर अजित पवार यांनी सर्व राज्यांमध्ये पक्ष विस्ताराची घोषणा केली होती. जम्मू-काश्मिर विधानसभा निवडणूकही अजित पवार पक्षाने लढवली होती.
दरम्यान, अजित पवारांची राष्ट्रवादी भाजप प्रणित एनडीएचा घटकपक्ष आहे. मात्र दिल्ली विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. त्यामुळे पक्षवाढीसाठी अजितदादा राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.