श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले. ते दि रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) या संघटनेचे सदस्य होते. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये टीआरएफच्या स्वयंघोषित म्होरक्याचाही समावेश आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा पथकाने श्रीनगरमध्ये एक कार रोखली. त्या कारमधून प्रवास करणाऱ्या दहशतवाद्यांनी पलायनाचा प्रयत्न करताना गोळीबार सुरू केला.
त्याला सुरक्षा जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात तिन्ही दहशतवादी ठार झाले. मागील महिन्यात श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी काही नागरिकांची हत्या केली. त्या हत्यासत्रात मारले गेलेले दहशतवादी सामील होते. दरम्यान, काश्मीरमधील बांदिपोरा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या छावणीला लक्ष्य करून ग्रेनेडचा मारा केला. मात्र, नेम चुकल्याने ग्रेनेडचा रस्त्यालगत स्फोट झाला. त्यामध्ये कुठलीही हानी झाली नाही.