तीन लाख मतदार ठरविणार जुन्नरचा आमदार

नारायणगावातील बूथ क्र. -327 आदर्श, तर बूथ क्र. -252 सखी केंद्र

जुन्नर – विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा शनिवारी (दि. 19) सायंकाळी थंडावल्यानंतर निवडणूक विभागाच्या हालचालींना गती मिळाली आहे. सोमवारी (दि. 21) मतदान होत असून जुन्नर विधानसभा मतदारसंघात मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना रविवारी (दि. 20) लेण्याद्री येथे निवडणूक साहित्याचे वाटप करण्यात आले. असून सोमवारी जुन्नर विधानसभा मतदारसंघातील सुमारे तीन लाख मतदार आपले बहुमूल्य मत देऊन 11 उमेदवारांचे भवितव्य मशीन बंद करणार आहे. तर या तीन लाख मतदारांनी आपला लोकप्रतिनिधी म्हणून कोणाला पसंगी दिली आहे, याचे उत्तर गुरुवारी (दि. 24) समजणार आहे.

जुन्नर विधानसभा मतदारसंघात 356 मतदान केंद्र असून 1 लाख 45 हजार 875 महिला व 1 लाख 53 हजार 773 पुरुष मतदार असे एकूण 2 लाख 99 हजार 648 मतदार मतदानाचा हक्‍क बजावणार आहेत. याकरिता प्रत्येक बूथवरील केंद्राध्यक्ष व चार स्तरांवरील मतदान अधिकारी मिळून 1424 कर्मचारी, 356 शिपाई, 356 पोलीस आदी एकूण 2352 कर्मचारी कार्यरत असून सुमारे 200 कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत.

कर्मचारी व मतदानासाठीची ईव्हीएम यंत्रे मतदानकेंद्रांवर पोहोचविण्यासाठी 63 बसेस, 9 मिनी बसेस व 77 जीपांची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी सारंग कोडलकर व सहायक निवडणूक अधिकारी हनुमंत कोळेकर यांनी दिली.

दरम्यान पावसाची संततधार सुरू असल्यामुळे कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली होती. तालुक्‍यातील आदर्श केंद्र (बूथ क्र. -327) नारायणगाव येथे तर सखी केंद्र (बूथ क्र. -252) जुन्नर शहरात उभारण्यात आलेले आहे. सर्व मतदान केंद्रांवर पाणी, वीज व इतर सोयींची व्यवस्था केली असून 174 व्हीलचेअर्स उपलब्ध केल्याची माहिती भौतिक सुविधेचे प्रमुख पांडुरंग मेमाणे यांनी दिली. तर आदिवासी पश्‍चिम भागातील मोबाइल कनेक्‍टिव्हिटी नसलेल्या 19 केंद्रांवर मेसेंजर्स नियुक्‍त करण्यात आले आहेत.

पोलिसांचा फौजफाटा
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पाच पोलीस निरीक्षक, दोन उपनिरीक्षक, 12 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 160 पोलीस कर्मचारी, राज्य राखीव दलाचे जवान, 29 वनविभागाचे कर्मचारी, 169 होमगार्ड, सीआयएसएफचे 100 जवान आदी फौजफाटा तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)