नवी दिल्ली- कोविड-19 च्या रुग्णांवर योग्य उपचार होण्यासाठी अधिक खाटांची तसेच क्रिटीकल केअर सेवांची उपलब्धता असावी आणि या आरोग्य सेवांसाठी योग्य आणि पारदर्शक पद्धतीने पैसे आकारले जावे, यादृष्टीने, खाजगी आरोग्य सेवांनाही कोविड उपचार व्यवस्थापनात सहभागी करून घेण्यासाठी सक्रिय प्रयत्न करावेत, असे निर्देश केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत.
या संदर्भात, महाराष्ट्रासह, तमिळनाडू, ओडिशा, गुजरात, उत्तरप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, कर्नाटक आणि मध्यप्रदेश या राज्यांनी याआधीच पावले उचलली आहेत. त्यांनी खाजगी आरोग्य सेवा देणाऱ्या रुग्णालयांशी चर्चा करून, कोविड-19 च्या रुग्णांना माफक दरात क्रिटीकल केअर सेवा दिली जावी यासाठी करार केला आहे. राज्यांनी, कोविड उपचार व्यवस्थापनात खाजगी आरोग्य क्षेत्राला सामावून घेत, सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही आरोग्यसेवांनी एकत्र येऊन कोविड वैद्यकीय व्यवस्थापन करावे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हंटले आहे.
करोना संशयितांच्या नमुन्यांची चाचणी करण्याची क्षमता देशात सातत्याने वाढवली जात आहे. सध्या देशात दररोज 3 लाख चाचण्या केल्या जाऊ शकतात. आतापर्यंत देशात एकूण 59,21,069 चाचण्या करण्यात आल्या असून, गेल्या 24 तासांत, 1,54,935 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
आतापर्यंत देशात एकूण 907 प्रयोगशाळांचे जाळे उभारण्यात आले आहे. यात 659 सरकारी प्रयोगशाळा आणि 248 खाजगी प्रयोगशाळा आहेत.