दुर्दैवी ! मुंबईतील गोवंडीत घर कोसळून 3 ठार

मुंबई – राज्यात चार दिवसांपासून पावसाने हाहाकार माजविला आहे. यातच मुसळधार पावसामुळे गोवंडीत दुमजली घर कोसळले आहे. या दुर्घटनेत तीन जण ठार झाले असून सातजण जखमी झाले आहेत. या जखमींवर घाटकोपरच्या राजावाडी आणि सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नेहा परवेज शेख, मोकर झबीर शेख आणि शमशाद शेख अशी मृतांची नावे आहेत. ही दुर्घटना आज पहाटे 4 वाजून 58 मिनिटांनी घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, गोवंडीच्या शिवाजीनगरमधील बॉम्बे सिटी हॉस्पिटलजवळ पहाटे सर्वजण साखर झोपेत असताना हे दुमजली घर कोसळले. यामुळे परिसरात एकच हाहाकार उडाला.

घर कोसळण्याचा आवाज आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांच्या आक्रोशामुळे जागे झालेल्या शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तत्काळ मदतकार्यास सुरुवात केली. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यानंतर रेस्क्‍यू ऑपरेशनला सुरुवात झाली. मात्र, पाऊस आणि अंधारामुळे मदत कार्यात व्यत्यय येत होता. तसेच हे घर दाटीवाटीच्या भागात असल्यानेही मदतकार्यात अडथळा येत होता.

या दुर्घटनेत एकूण 10 जण गंभीर जखमी झाले. या सर्वांना तत्काळ राजावाडी आणि सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच गंभीर जखमी झालेल्यांचा मृत्यू झाला. इतर सात जणांवर उपचार सुरू असून त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.