देर अल-बलाह – इस्रायल आणि हमासमध्ये आजपासून ६ आठवड्यांची प्राथमिक टप्प्यातली युद्धबंदी लागू झाली. यामुळे गेल्या १५ महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध थांबण्याच्या आशा वाढल्या आहेत. आज सकाळी ८.३० वाजल्यापासून युद्धबंदी लागू केली जाणार, असे ठरले होते. मात्र सुटका केल्या जाणाऱ्या ओलिसांची यादी हमासकडून मिळू न शकल्यामुळे युद्धबंदी लागू होण्याला ३ तासांचा उशीर झाला. यामुळे संदिग्धतेचे वातावरण निर्माण झाले होते.
युद्धबंदी औपचारिकपणे लागू होण्यापुर्वीच युद्धग्र्स्त भागांमध्ये आनंदोत्सवाला सुरुवात झाली होती. गाझाच्या उत्तरेकडील भागातून दक्षिणेकडील भागांमध्ये विस्थापित झालेल्या शेकडो पॅलेस्टिनींनी आपापल्या घरी परत जायला सुरुवात देखील केली होती.
दरम्यान हमासकडून ओलिसांची नावे जाहीर व्हायला तांत्रिक कारणामुळे उशीर झाला. नियोजित वेळापत्रकापेक्षा ३ तास उशिराने म्हणजे सकाळी ११ वाजून १५ वाजता अधिकृतपणे युद्धबंदी लागू झाली. या दरम्यान पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात हमासच्या ताब्यातील सुटका होण्याची शक्यता असलेल्या ओलिसांची नावे इस्रायलने जाहीर केली होती.
रोमी गोनेन (वय २४, एमिली दामारी (२८) आणि दोरोन स्टेनब्रेकर (३१) या ३ ओलिसांची आज सुटका केली जाणार आहे. गोनान हिचे ७ ऑक्टोबर रोजी नोवा येथील संगीत समारंभातून इपहरण करण्यात आले होते. तर उर्वरित दोघांना किबुत्झ फार अझा येथून पळवून नेण्यात आले होते. दामारी हा इस्रायली-ब्रिटीश असे दुहेरी नागरिकत्व असलेला युवक आहे.
ही नावे हमासकडून औपचारिकपणे जाहीर केली जाणे अजून बाकी आहे. त्यामुळे हमासने आपला शब्द अद्याप पाळला नाही, अशी टीका इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी केली. जोपर्यंत नावे जाहीर होत नाहीत, तोपर्यंत इस्रायली सैन्याचे हल्ले सुरूच राहतील, असे म्हटल्यानंतर दोन तासांनी हमासकडून ही नावे जाहीर करण्यात आली.
३ तासांच्या विलंबाच्या कालावधीतही इस्रायलचे हल्ले
सुटका होणाऱ्या इस्रायली नागरिकांची नावे जाहीर व्हायला ३ तास उशीर झाला. या कालावधीत युद्धबंदीलाही स्थगित ठेवले गेले. या काळात इस्रायलने केलेल्या माऱ्यात किमान २६ जण ठार झाले, असे गाझातल्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. मात्र ठार झालेले सामान्य नागरिक होते का दहशतवादी होते, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. इस्रायली सैन्य बफर झोनमधून माघार घेत असल्यामुळे या भागातील नागरिकांनी दूर रहावे, असे इस्रायली सैन्याने म्हटले होते.
कट्टरवादी राष्ट्रीय सुरक्षा मंत्र्याचा राजीनामा
इस्रायल आणि हमासमधील युद्धबंदीला इस्रायलमधील कट्टर विचारांच्या ज्युइश पॉवर या पक्षाचा विरोध आहे. या पक्षाचे राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इटामार बेन गविर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गविर यांच्या राजीनाम्यामुळे नेतान्याहू यांचे आघाडी सरकार जरी कमकुवत झाले असले, तरी सरकार अस्थिर होणार नाही.
इस्रायलच्या मंत्रिमंडलाकडून युद्धबंदीच्या कराराला मंजूरी दिली जात असतानाही इटामार बेन गविर यांनी विरोध दर्शवला होता. हमास पुर्णपणे नष्ट केल्याशिवाय युद्ध थांबवण्यात येऊ नये, असे त्यांचे म्हणणे होते. युद्धबंदी झाली, तर राजीनामा देण्याचा इशाराही त्यांनी आगोदरच दिला होता.