पारगाव – पारगाव (ता. दौंड) येथील भीमा नदी पुलाखाली तिसऱ्या दिवशी मृतदेह आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर मिळालेले मृतदेह हे आत्महत्या की हत्या हे मोठे आव्हान यवत पोलीस यंत्रणे पुढे आहे. दरम्यान, मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही.
भीमा नदी पुलाखाली बुधवारी (दि. 18) एक महिलेचे शुक्रवारी (दि. 20) एक पुरुषाचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असतानाच शनिवारी (दि. 21) पुन्हा एका महिलेचा मृत्यदेह पाण्यावर तरंगताना स्थानिक मच्छिमारांच्या निदर्शनास आला. घटनास्थळी केडगाव पोलीस दाखल झाले आहे.
पारगाव पुलाच्या पश्चिमेला 150 फुटांवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा असून तो सध्या पूर्ण बंद केलेला आहे.त्यावरून अगदी थोडेच पाणी पडत आहे. शिवाय मोठ्या प्रमाणात जलपर्णी आहे. सलग तिसऱ्या दिवशी मोठ्या पुलाच्या बाजूला मृतदेह पाण्यात मिळत असल्याने याचा शोध लावण्याचे पोलिसांपुढे आव्हन निर्माण झाले आहे.