पुणे : शहरातील नागरिकांना सवलतीच्या दरात मिळकतकर भरण्यासाठी महापालिकेकडून 3 दिवसांची मुदतवाढ देण्यात आहे. ही मुदत 31 मे रोजी संपली होती. मात्र, मुदत संपण्याच्या दोन ते तीन दिवस आधी मिळकतकर विभागाचा सर्व्हर डाऊन झाल्याने अनेक नागरिकांना कर भरता आला नाही.
त्यामुळे, महापालिका प्रशासनाने मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर अखेर महापालिका आयुक्तांनी ही 3 जून पर्यंत मुदतवाढ दिली आहे. दरम्यान, 31 मे अखेर पर्यंत पालिकेच्या तिजोरीत विक्रमी 939.89 कोटींचा कर जमा झाला आहे. महापालिका प्रशासनाकडून या एप्रील आणि मे महिन्यात सुमारे 1 हजार कोटींच्या कर उत्पन्नाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. ते पूर्ण झाले नसले तरी महापालिकेस मिळालेले हे उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत अडीचशें कोटीं पेक्षा अधिक आहे.
महापालिकेकडून शहरातील नागरिकांना सवलतीच्या दरात कर भरण्यासाठी 31 मे पर्यंत मुदत दिली जाते. त्यानुसार, 25 हजार रूपयांपेक्षा कमी कर असलेल्या नागरिकांना सर्वसाधारण करात 10 टक्के तर 25 हजारांपेक्षा अधिक कर असलेल्या नागरिकांना 5 टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे जास्तीत जास्त पुणेकर या मुदतीपूर्वी कर जमा करतात.
महापालिकेने दिलेल्या मुदतीत सुमारे 5 लाख 93 हजार 270 मिळकतधारकांनी 939 कोटी 89 लाख कर पालिकेच्या तिजोरीत जमा केला आहे. तर नागरिकांना महापालिकेने 19 कोटी 21 लाख रूपयांची सवलत दिलेली आहे. दरम्यान, महापालिकेच्या मिळकतकराचा सर्व्हर शेवटच्या काही दिवसांमध्ये डाऊन असल्याने अनेक पुणेकरांना कर भरता आला नव्हता. त्यामुळे राष्ट्रवादी अर्बन सेलच्या वतीने महापालिका प्रशासनाने कर भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणीही केलेली होती.