न्हावरे(प्रतिनिधी) :– न्हावरे (ता.शिरूर) येथे अंधेरी (मुंबई) येथून आलेल्या ७५ वर्षीय पुरुष व ६५ वर्षीय महिलेचा करोना अहवाल पॉझीटीव आला आहे. त्यामुळे शिरूरच्या पूर्व भागात मांडवगण फराट्यासह आज (दि.२७) दिवसभरात तीन रुग्ण आढळून आल्यामुळे पूर्व तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत शिरूर तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी माहिती दिली.
२० मे रोजी एकमेकांचे नातेवाईक असलेले ज्येष्ठ महिला व पुरुष अंधेरी (मुंबई) येथून न्हावरे येथे आले होते.मात्र, ग्रामपंचायत पदाधिकारी व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे संबंधित महिला व पुरुषाला येथीलच श्री.मल्लिकार्जुन विद्यालयात क्वारंटाइन करण्यात आले होते.दरम्यान, दोघांनाही काल (दि.२६) ताप व खोकला अशी तीव्र लक्षणे आढळून आली होती. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील औंधच्या सरकारी रुग्णालयात पाठवले होते. तेथे त्यांचे करोना अहवाल तपासणीनंतर आज सायंकाळी पॉझीटीव आले आहेत.
संबंधित करोनाग्रस्त यांचा कोणाशीही संबंध आलेला नसून,ते न्हावरे येथे आल्यापासून त्यांना येथील श्री.मल्लिकार्जुन विद्यालयात क्वारंटाइन करण्यात आले होते.त्यामुळे परिसरातील जनतेने घाबरून जाऊ नये. तरी खबरदारी म्हणून न्हावरे परिसराचा तीन किलोमीटरचा परिसर सील करण्यात येणार आहे. असे तालुका आरोग्य पर्यवेक्षक सुरेश लवांडे यांनी दैनिक प्रभातशी बोलताना सांगितले.
क्वारंटाइन व्यक्तींमध्ये भीतीचे वातावरण…..
न्हावरेत अजून ११ व्यक्ती बाहेर गावावरून आलेल्या असून, त्यांनाही येथील श्री. मल्लिकार्जुन विद्यालयात क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यामुळे क्वारंटाइन केलेल्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.