मुलीच मिळत नसल्याने चीनमधील 3 कोटी लोक ‘अविवाहित’

बीजिंग. दि. 18- मुलाचा हव्यास आणि मुलीच्या जन्माला नकार ही काही केवळ भारतातील समस्या नाही. जगातल्या इतर देशांमध्येही ही समस्या असून, त्याचे चटके त्यांना आता बसू लागले आहेत. भविष्यात ते अगदी गंभीर वळण घेणार असल्याचेही त्यातून समोर येत आहे.

चीनमध्ये नुकतीच जनगणना करण्यात आली. त्यात एक अत्यंत गंभीर बाब समोर आली आहे. त्यानुसार त्या देशातील अविवाहित पुरुषांची संख्या तब्बल 3 कोटींच्या घरात गेली असल्याचे आढळून आले आहे. लग्न तर करायचे आहे, मात्र मुलीच मिळत नाहीत अशी स्थिती तेथे निर्माण झाली आहे.
तेथील एका दैनिकाने दिलेल्या बातमीनुसार मुलगाच हवा हा जो अट्टहास होता, त्याचाच हा परिणाम आहे.

गेल्या वर्षी चीनमध्ये 1.2 कोटी मुले जन्माला आल्या. त्यात 111 मुलांमागे 100 मुली असे प्रमाण होते. दहा वर्षांपूर्वी तर त्यापेक्षा मोठी तफावत होती. तेव्हा 118 मुलांमागे 100 मुली असे प्रमाण होते. भविष्यात ही विसंगती अशीच कायम राहिली तर काल जन्माला आलेल्या मुलांच्या विवाहाच्या वेळी त्यांना कदाचित मुलीच मिळणार नाहीत, असे त्या बातमीत म्हटले आहे.

लोकसंख्या नियंत्रणाचा एक भाग म्हणून चीनमध्ये प्रदीर्घ काळ एकच मूल हे धोरण राबवण्यात आले आहे. आता त्यात काहीशी शिथिलता आणत दुसरे मूल जन्माला घालण्याची जोडप्यांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही काळात जी तफावत निर्माण झाली आहे, त्यामुळे मुलींची संख्या जी कमी झाली आहे, ती सांधण्यात बराच वेळ जाणार असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.