बेल्ह्यात ३ करोना बाधित, ९ अहवाल प्रतीक्षेत

बेल्हे (प्रतिनिधी) – बेल्हे (ता. जुन्नर) येथील किराणा मालाच्या व्यावसायिकाच्या संपर्कातील ३ व्यक्तींचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. या व्यावसायिकांच्या संपर्कातील ६ व्यक्तींचे स्वॅब बुधवारी (दि .१५) तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट गुरुवार (दि.१६) रात्री उशिरा प्राप्त झाला. त्यापैकी तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये एक मुलगी वय ५ वर्ष, एक पुरुष वय ६० वर्ष व एक महिला वय ५५ वर्ष अशा तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या तिघांवर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
किराणा व्यावसायिकाच्या दुकानातील ३ कामगारांचे स्वॅब गुरुवार (दि. १६) घेण्यात आले, असून गुळुंचवाडी येथील एका करोना बाधित महिलेच्या संपर्कातील ६ व्यक्तींचे स्वब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यांचा रिपोर्ट आज रात्री पर्यंत येणे अपेक्षित आहे.अशी माहिती बेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.एस. बी.थोरात यांनी दिली.
यामुळे बेल्हे येथील करोना रुग्ण संख्या आता ४ झाली आहे. प्रशासनाने बेल्हे, गुळंचवाडी गावे व ५ किलोमीटर परिसर पुढील सूचना येईपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. प्रत्येकाने मास्कचा वापर करावा तसेच विनाकारण घराबाहेर पडू नये अस आव्हान प्रशासनाकडून करण्यात येत आहे. आळेफाटा पोलिसांनी नियम न पाळणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.





