धारावीत आढळले ३ कोरोना रुग्ण

मुंबई – सुरुवातीपासूनच मुंबई शहर देशातील कोरोनाचा प्रमुख हॉटस्पॉट ठरलं आहे. अशातच मुंबईतील धारावी या सर्वात मोठ्या झोपडपट्टीमध्ये कोरोना विषाणूने शिरकाव केल्याने चिंता व्यक्त केली जात होती. मात्र मुंबई महापालिकेने धारावीमध्ये ‘चेस द व्हायरस’ योजना राबवत येथील कोरोना प्रादुर्भाला अटकाव करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात यश मिळवलं आहे.

मुंबई महापालिकेतर्फे जाहीर करण्यात आलेल्या अद्यावत आकडेवारीनुसार आज धारावी येथे केवळ ३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आज ३ रुग्ण वाढल्याने येथील एकूण रुग्ण संख्या २,३३८ एवढी झाली असून यापैकी ३२९ रुग्ण उपचार घेत आहेत. धारावीतील १७६८ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले असून त्यांना  घरी सोडण्यात आले आहे.

तत्पूर्वी, मुंबईमध्ये कोरोनाचा पहिला बाधित ११ मार्चरोजी सापडला होता. यानंतर जवळपास ३ आठवड्याने म्हणजेच १ एप्रिल रोजी धारावीत कोरोनाचा रुग्ण सापडला. यानंतर महापालिकेने धारावीत ‘चेस द व्हायरस’ म्हणजेच व्हायरसचा पाठलाग ही मोहीम युद्धपातळीवर राबवत घरोघरी आरोग्य तपासणी केली.

अत्यंत दाटीवाटीच्या धारावी झोपडपट्टीत कोरोना प्रादुर्भाव झाल्यानंतर येथील परिस्थिती नियंत्रणात येईल का? असे प्रश्न उपस्थित होत होते. मात्र आता येथील नव्याने सापडणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याने महापालिकेच्या मोहिमेला यश येत असल्याचं दिसतंय.

Leave A Reply

Your email address will not be published.