कोल्हापूर – ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी आज आणखी ३ आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दाभोळकर हत्या प्रकरणातील संशयित सचिन अंदुरे आणि गौरी लंकेश हत्या प्रकरणातील २ संशयित आरोपी गणेश मिस्कीन आणि सचिन बद्दी या तिघांचा यामध्ये समावेश आहे.
या सुनावणीवेळी संशयित आरोपी सचिन अंदुरेने तपास अधिकारी तिरुपती काकडे यांनी छळ केल्याचा धक्कादायक आरोप न्यायालयासमोर केला. मी सीबीआय कोठडीत असतानाही मध्यरात्री तीन वाजेपर्यंत माझा छळ केला, असा दावा देखील अंदुरेने केला. सरकारी वकिलांनी संशयितांचा या हत्येत सहभाग असून त्यांच्या तपासासाठी १५ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र, न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी दिली.
दरम्यान सुनावणी झाल्यानंतर संशयित आरोपींना पोलिसांनी अज्ञातस्थळी हलवल होत. मात्र, रिमांडचार्टवर आरोपींच्या सह्या राहिल्यामुळे त्यांना पुन्हा न्यायालयात आणण्यात आले. यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.