चंडीगढ – पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या (आप) तीन बंडखोर आमदारांनी गुरुवारी त्या राज्यातील सत्तारूढ कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे गृहकलहाने घेरलेल्या पंजाब कॉंग्रेसला आणि विशेषत: मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना मोठेच बळ मिळाल्याचे मानले जात आहे.
कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या आमदारांमध्ये सुखपालसिंग खैरा, जगदेवसिंग कमलू आणि पिरामल सिंग यांचा समावेश आहे. त्यांनी अमरिंदर यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले. त्या घडामोडीमुळे खैरा यांची घरवापसी झाली आहे. त्यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकून डिसेंबर 2015 मध्ये आपची वाट धरली. त्या पक्षाच्या तिकिटावर ते 2017 मधील विधानसभा निवडणुकीत विजयी झाले.
मात्र, आप नेतृत्वाशी बिनसल्याने त्यांनी पंजाबी एकता पार्टी या नव्या पक्षाची स्थापना केली. त्यांच्यासह तीन आमदारांना कॉंग्रेसमध्ये दाखल करून घेऊन अमरिंदर यांनी त्यांची ताकद दाखवल्याचे मानले जात आहे.
अमरिंदर यांच्यावर कॉंग्रेसचे काही आमदार आणि विशेषत: माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू नाराज आहेत. त्यामुळे पंजाब कॉंग्रेसमध्ये गृहकलह सुरू झाल्याचे चित्र आहे. त्यातून कॉंग्रेस नेतृत्वाने पंजाब शाखेतील मतभेद दूर करण्यासाठी एक समितीही स्थापन केली आहे.