पिंपरीत दिवसभरात 2938 बाधित 

  • उपचारादरम्यान 17 रुग्णांचा मृत्यू

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असून रोजच धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. सोमवारी करोनाबाधितांचा आकडा काहीसा कमी झाल्याने दिलासा मिळाला होता. परंतु दुसऱ्याच दिवशी अवघ्या 24 तासांत पुन्हा तब्बल 2938 नव्या रुग्णांची भर पडल्याने बाधितांचा आकडा 1 लाख 55 हजार 984 इतका झाला आहे. तर गेल्या 24 तासांत 17 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

सोमवारी प्रतिक्षेत असलेल्या रुग्णांचा अहवाल आज (मंगळवारी) महापालिकेला प्राप्त झाला. आजच्या अहवालानुसार शहरातील 2904 जणांना करोनाची लागण झाली असून शहराबाहेरील 34 जणांचा करोना अहवाला सकारात्मक आला आहे. तर गेल्या 24 तासांत 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमधील पंधराजण शहरातील रहिवाशी होते. तर शहराबाहेरील दोघांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील मृतांचा आकडा 2094 वर पोहोचला असून शहराबाहेरील 850 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृत्यूची संख्या 2944 इतकी झाली आहे.

गेल्या 24 तासांत मृत्यू झालेल्यांमध्ये शहरातील चिंचवड, थेरगाव, कासारवाडी, पिंपळे निलख, दापोडी, खराळवाडी, शाहूनगर, कस्पटेवस्ती, भोसरी, निगडी, सांगवी येथील पंधराजणांचा समावेश आहे. तर महापालिका हद्दीबाहेरील घोरपडी आणि धायरी येथील रहिवाशी असलेल्या दोघांचा आज दिवसभरात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत शहरातील 1 लाख 30 हजार 129 जण करोनामुक्त झाले असून शहराबाहेरील 9073 जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. आज दिवसभरात करोनाची कोणतीही लक्षणे न आढळल्यामुळे 1679 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर गेल्या दोन दिवसांतील 1752 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. आज नव्याने संशयित असलेल्या 6514 जणांची करोना चाचणी करण्यात आली आहे.

शहरात सध्या 23761 रुग्ण
पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी करोनाचे तब्बल 23761 उपचाराधीन रुग्ण आहेत. त्यात 3969 रुग्ण रुग्णालयात दाखल असून 19792 रुग्ण घरात राहूनच उपचार घेत आहेत.

जिल्हा रुग्णालयातील करोनाबाधितांच्या संख्येत घट
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात मंगळवारी (दि. 6) करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली. गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयामध्ये दररोज 30 ते 40 करोनाबाधित रुग्ण आढळत होते. दरम्यान आज, रुग्णसंख्येत घट होत दिवसभरात 12 करोनाबाधित रुग्ण आढळले.
सांगवी, डेक्कन जिमखाना, दापोडी, कात्रज, सोमवार पेठ – पुणे, धनकवडी, पिंपळे गुरव या परिसरातील रुग्ण करोनाबाधित आढळले आहेत. रुग्णालयातून आज चौघे जण बरे होऊन घरी परतले. कात्रज, कोरेगाव, पिंपळे गुरव, डेक्कन जिमखाना या परिसरातील हे रुग्ण आहेत. त्यामध्ये दोन पुरुष आणि दोन महिला रुग्णांचा समावेश आहे. रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झाला. त्यामध्ये तीन पुरुष आणि एका महिला रुग्णाचा समावेश आहे. थेरगाव, येरवडा, जुनी सांगवी, मॉडेल सोसायटी येथील हे रुग्ण होते. पिंपरी-चिंचवड परिसरातील 2 करोना संशयित रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयामध्ये सध्या 71 जणांवर उपचार सुरू आहे. त्यातील 39 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयातून आत्तापर्यंत 994 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 1 हजार 196 जणांना होम क्वारंटाइन केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.