उत्तरप्रदेशात बस अपघातात 29 ठार

यमुना एक्‍स्प्रेस वे वरील प्रकार

आग्रा – उत्तरप्रदेशात यमुना एक्‍स्प्रेस वे वर एक प्रवासी बस रस्त्याच्याकडेला उलटून झालेल्या अपघातात 29 जण ठार झाले तर अन्य 18 जण जखमी झाले आहेत. ही बस लखनौहून दिल्लीला चालली होती व त्यात 50 प्रवासी होते. या अपघाताची चौकशी करण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने एक समिती स्थापन केली आहे.

ही बस भरधाव वेगात होती. चालकाचे तिच्यावरील नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यामध्ये पडल्याने हा अपघात झाला. उत्तरप्रदेश सरकारने अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहींर केली आहे. पोलिसांनी सांगितले की ही स्लीपर क्‍लासची बस होती. एतमादपुर गावाजवळील पुलावरून ही बस कोसळून हा अपघात झाला. राज्याचे पोलिस महासंचालक या प्रकरणात जातीने लक्ष घालून अपघातग्रस्त लोकांना मदत करीत असून जखमींवरील उपचारांमध्येही ते लक्ष घालीत आहेत.

पोलिसांनी सांगितले की ही बस उत्तरप्रदेश परिवहन मंडळाची जनरथ बस होती. उत्तरप्रदेशातील नॉयडा ते आग्रा शहराला जोडणारा हा यमुना एक्‍स्प्रेस वे हा 165 किमीचा सहा पदरी महामार्ग आहे. अपघाताचे वृत्त समजताच उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा आणि परिवहन मंत्री स्वतंत्र देव सिंह यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. राज्य सरकारने या अपघाताच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या समितीला त्यांनी 24 तासांत आपला अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथसिंह, कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी इत्यादींनी या वृत्तावर तीव्र दुख: व्यक्त केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.