औषध व धूर फवारणी करण्याची गरज
आरोग्य विभागाची “ड’ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत मोहीम ः चौघांना नोटीस
क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कंटेनर तपासणी केली जात आहे. मात्र, शहरातील डास उत्पत्ती थांबविण्यासाठी औषध व धूर फवारणी होणे गरजेचे आहे. पावसाळ्यात अनेक भागात धूर फवारणी होत नसल्याने आजाराचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. याबाबत, आरोग्य विभागाने शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत औषधी फवारणी करण्याबाबत लक्ष देण्याची गरज आहे.
पिंपरी – शहरात पावसाळ्याच्या दिवसात साथीच्या आजाराचा फैलाव होण्याची शक्यता आहे. यामुळे, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे या दिवसात कंटेनर तपासणी मोहिम राबविली जात आहे. या दरम्यान “ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत एका महिन्यात 284 घरात डासांच्या अळ्या आढळून आलेल्या आहेत. यामधील, चार जणांना नोटीस देण्यात आलेल्या असून तीन व्यक्तींना तीन हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. साथीचे आजार रोखण्यासाठी शहरातील क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या आरोग्य विभागाच्यावतीने तपासणी मोहीम राबविली जात आहे.
यामधील, “ड’ प्रभागातील पिंपळे निलख, पिंपळे सौदागर व पिंपळे गुरव क्षेत्रीय कार्यालयातर्फे चौदा कर्मचाऱ्यांनी सर्व्हे केला. यामध्ये, 10 जून ते 13 जुलैपर्यत 14 हजार 516 घरांची तपासणी करण्यात आली. यावेळी, फ्रीज, कूलर, झाडांच्या कुंड्या यासह पाणी साठविण्यात येणाऱ्या वस्तूंची तपासणी करण्यात आली. यामध्ये, 86 हजार 710 कंटेनर तपासणीदरम्यान 284 कंटेनरमध्ये डासांच्या अळ्या आढळून आल्या. तसेच, 254 ठिकाणी पाणी साचलेले टायर, पत्र्यांची तपासणी करण्यात आली. याबरोबर, 92 बांधकामांची पाहणी करण्यात आली.
शहरात साथीचे आजार टाळण्यासाठी ठिकठिकाणी औषध व धूर फवारणी केली जात आहे. तसेच, शहरातील विविध सोसायट्या, पानटपऱ्या, हॉटेल, बांधकामांच्या ठिकाणी तपासणी करताना डासांच्या अळ्या आढळून आल्यास दंडात्मक कारवाई केली जात आहे. याबाबत, नागरिकांनीही खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.
डॉ. अनिल रॉय, मुख्य आरोग्य अधिकारी, महापालिका