नाशिक : नाशिकमधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये अवघ्या 28 वर्षांच्या तरुणीचा झोपेतच ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे तिला झोपेतच एक नव्हे दोन नव्हे तर या तरुणीला झोपेतच 3 वेळा हार्ट अटॅक आला आणि तिचा झोपेतच मृत्यू झाला.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
लासलगावच्या टाकळी विंचूर या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली. कल्याणी मोकाटे ( वय 28) असं मृत तरुणीचं नाव आहे. कल्याणी रात्री नेहमीप्रमाणे तीच्या रूममध्ये झोपली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी बराच वेळ झाला तरी ती उठली नाही म्हणून कुटुंबीयांनी तिच्या खोलीत जाऊन तिला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र तिने कोणताच प्रतिसाद दिला नाही.
यामुळे कुटुंबीयांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी कल्याणीला तपासून मृत घोषित केले. यामुळे तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. कल्याणी मोकाटे ही आपल्या पालकांसोबत टाकळी विंचूर या गावात राहत होती. कल्याणही उच्चशिक्षित होती. अविवाहित होती. जेव्हा तिचं शवविच्छेदन करण्यात आले तेव्हा त्यामधून धक्कादायक माहिती समोर आली.
पोस्टमोर्टम अहवाल समोर
कल्याणी मोकाटेच्या पोस्टमोर्टम अहवालामध्ये तिला झोपेत एका पाठोपाठ एक असे ३ हृदयविकाराचे धक्के आले होते. ह्रदयविकाराचा धक्का बसल्यामुळे तीचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले. हे समजताच तिच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.