खंडाळ्यात 28 कारभारी जागा रिक्त

अधिकारीच नसल्याने विकासप्रक्रिया मंदावली 
शिरवळ 
– पंचायतराज व्यवस्थेमधील सर्वसामान्य जनतेचे मंदिर असलेल्या पंचायत समितीमध्ये मुख्य कारभाऱ्यासह इत्तर 28 ठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती न झाल्याने कारभार रामभरोसे असाच चालला आहे. त्यामुळे विकासाची प्रक्रिया गतिमान होण्याऐवजी मंदावली आहे.
खंडाळा या तालुक्‍याच्या ठिकाणी सर्वच शासकिय कार्यालय असल्याकारणाने ग्रामीण भागासह सर्व ठिकाणवरील जनतेची ये-जा सुरु असते. त्यामध्ये प्राधान्य क्रमाने पंचायत समितीला अनन्य साधारण महत्व आहे. सर्वसामान्य जनलेला दिलासा देणाऱ्या विविध प्रकारच्या योजना व इचर कामानिमित्त येणाऱ्या अडचणी याचा निपटारा येथूनच होत असतो.

पंरतु या कार्यालयात प्रभारी अधिकारी व काही कर्मचाऱ्यांची मनमानी सुरु असल्यामुळे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास होत असतो. यामध्ये तालुक्‍याचे सनियंत्रण, ग्रामपंचायत विकास कामांचे नियोजन आणि नागरिकांच्या समस्या दूर करण्याचे काम करणारे गटविकास अधिकारी हे पद गत एक महिन्यापासून रिक्त आहे. प्रभारी अधिकाऱ्यांचा
नुसता खो-खो चालु आहे. याच कारणाने कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी चहाच्या टपरी वरील आपला ठिय्या वाढविला आहे. महिला कर्मचाऱ्यांनी तर कामकाजात आपल्या मर्जीचे कायदे आणि नियम बनविले आहेत. त्यामुळेच गटविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती होणे गरजेचे झाले आहे.

याच बरोबर तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था अधिक बळकट व्हावी यासाठी 65 गावांसह वाडी वस्तीवर जिल्हा परिषदेच्या 108 शाळा असून सुमारे साडेचारशे शिक्षक आहेत. त्यांच्यावर नियंत्रण रहावे तसेच भावी पिढीला योग्य शिक्षण मिळावे व सुसंस्कृत पिढी घडविण्याच काम शिक्षण विभागावर सोपविण्यात आले आहे. परंतु या विभागाची जबाबदारी संभाळणाऱ्या अधिकाऱ्याची गत काहि महिन्यापूर्वी पदोन्नती झाल्याने या विभागाला गेली पाच महिने गट शिक्षणाधिकारी नाहीत. विस्तार अधिकारी यांच्याकडे कार्यभार सोपवून वरिष्ठ प्रशासन सुस्त पडले आहे. याच बरोबर विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख अशी पदे रिक्त असल्याने प्रभारी अधिकारीच सर्व प्रकाराच्या भूमिका निभावत आहेत. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करीत शिक्षणाचा गाडा अडखळत सुरु आहे.

ग्रामीण व्यवस्थेचा प्रमुख भाग असलेल्या जिल्हा परिषदे बांधकाम उपपिभागाचे उपअभियंता ए. एस. गायकवाड येत्या 31 जुलैला सेवेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळे तातडीने त्यांच्या जागी अधिकारी रुजू होणार की प्रभारी अधिकारीच विकासाचा गाडा हाकणार? हे पाहावे लागणार आहे. तसेच पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदली नंतर नवीन अधिकाऱ्याने कार्यभार स्विकारलेला नाही.दरम्यान पावसाचे दिवस असल्याने जनावरांना साथीच्या रोगाची लागण होण्याची शक्‍यता मोठ्या प्रमाणात असते. परंतु या ठिकाणी रामभरोसे असाच कारभार सुरू आहे. याच बरोबर एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यरत असून या प्रकल्पाअतंर्गत तालुक्‍यात अनेक ठिकाणी अंगणवाड्या सुरु आहेत.

खेडोपाड्यात लहान मुलांसाठी असणाऱ्या पोषण आहार तसेच अनेक योजना हाकणाऱ्या तालुक्‍याच्या मुख्य कार्यलयास गेली अनेक वर्ष प्रभारी अधिकारी असल्याचे पहायला मिळत आहे. फलटण उपविभागाअंतर्गत खंडाळ्याचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जोडलेला आहे.त्यामध्ये एकच शाखा अभियंता कारभार संभाळतात आहेत. तालुका आरोग्य अधिकारी कायमस्वरूपी कार्यरत असताना विस्तार अधिकाऱ्यांची बदली झाली असून अन्य एक विस्तार अधिकारी 31 जुलैला सेवानिवृत्त होत आहेत, त्यामुळे या दोन्ही जागा रिक्तच राहणार आहेत. याचबरोबर शिरवळ, लोणंद, अहिरे येथील आरोग्य केंद्रात चार शिपाई पदे रिक्त आहे.

तालुक्‍यात पशुसंवर्धन विभागाच्या जनावरांच्या दवाखान्यात शिपायांची तीन पदे रिक्त आहेत. महिला बचत गट विभागाचे कामकाज पाहण्यासाठी विस्तार अधिकारी पद रिक्त आहे. तसेच कृषी विभागाचे विस्तार अधिकारी 30 जुनला सेवानिवृत्त झाले आहेत त्या ठिकाणीही कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही. पंचायत समितीला गतनऊ महिन्यापासून तर बांधकाम विभागाला गत सहा महिन्यापासून वरिष्ठ सहायक अधिकाऱ्याची गरज असतानाही ती जागा रिक्तच आहे. तर लोणंदच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वर्षापासून कनिष्ठ सहाय्यक नसल्याने कारभार तसाच सुरू आहे.

पंचायत समितीची अर्थवाहिनी असलेल्या वित्त विभागही यामधून सुटलेला नाही. विविध शासकिय योजना व लाभार्थ्यांचे बिल, पगार, विकास कामांचा येणारा निधी व त्याचे वाटप करण्यासाठी अडथळे येतात परंतु अर्थ विभागात एक सहाय्यक लेखाधिकारी व कनिष्ठ लेखाधिकारी ही पदे रिक्त आहेत ही त्यामुळे कामकाज संथ गतीने सुरू आहे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.