पुणे – शहरात एकूण 486 झोपडपट्ट्या असून, शहराच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत सुमारे 28 टक्के नागरिक झोपडपट्टयांमध्ये राहतात. महापालिकेच्या पर्यावरण सद्यःस्थिती अहवालातून समोर आले आहे.
महाराष्ट्रातील अत्यंत वेगाने विकसित होणारे शहर म्हणून पुणे वेगाने उदयास येत आहे. सामाजिक सुरक्षितता अन् उच्च दर्जाच्या नागरी सुविधांमुळे होणारे स्थलांतर शहरवाढीसाठी कारणीभूत असलेल्या घटकांपैकी एक महत्त्वपूर्ण घटक आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार, पुणे शहराची स्थलांतरित लोकसंख्या (रोजगार आणि शिक्षणासाठी) एकूण लोकसंख्येच्या 10 टक्के इतकी आहे.
मागील दशकात लोकसंख्या वाढीचा दर 22.73 टक्के इतका होता. सन 2011 च्या जनगणनेनुसार, शहराची लोकसंख्या 31.24 लाख आणि स्थलांतरित अंदाजे 4 ते 5 लाख म्हणजे एकूण लोकसंख्या अंदाजे 35 ते 36 लाख आहे.
पुण्यातील विकसित आयटी हब, बांधकाम क्षेत्र, लहान-मोठे उद्योगधंदे आणि सेवा क्षेत्रात रोजगार निर्माण होत आहेत. त्यामुळे राज्यातील विविध विभागांमधून विद्यार्थी, व्यावसायिक, नोकरदार, मजूरवर्ग पुण्याकडे धाव घेत आहे. त्यापैकी मजूर वर्गाचे प्रमाण प्रामुख्याने लक्षणीय आहे. हा मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात झोपडपट्टयांमध्ये राहताना दिसतो.
आकडे बोलतात :
15 क्षेत्रीय कार्यालये
486 घोषित आणि अघोषित झोपडपट्ट्या-वस्त्या
साडेसहा लाख नागरिकांचे झोपड्यात वास्तव्य
1 लाख 65 हजार घरांची एकूण संख्या