सातारा शहर पोलिसांकडून ट्रकचालकास अटक 28 लाखांचा औषध अपहार

सातारा – ट्रकमध्ये भरलेली औषधे हैद्राबादला पोहोचवण्यास सांगितल्यानंतर तो तेथे घेऊन न जाता तब्बल 28 लाख रुपयांच्या औषधांचा अपहार केल्याच्या गुन्ह्याचा छडा सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण (डीबी) विभागाने लावला. याप्रकरणी चालक अब्दुल मगदूम नदाफ (वय 32, मूळ रा. हरणाक, सिंदगी, विजापूर, कर्नाटक, सध्या रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव) याला अटक करुन पोलिसांनी ट्रक जप्त केला आहे. याप्रकरणी राजकुमार श्रीरंग शिंदे (वय 54, रा. शाहूनगर) यांनी तक्रार दिली होती.

याबाबत माहिती अशी, राजकुमार शिंदे यांनी स्वराज ट्रान्सपोर्टमधून शेतीची 28 लाख रुपये किमतीची औषधे दि. 8 ऑगस्ट रोजी साताऱ्यातून हैद्राबाद येथे पाठवली होती. ही औषधे ट्रक (एमएच-11-एएल-7869) यामध्ये भरण्यात आली होती. ही औषधे हैद्राबादमध्ये ज्या ठिकाणी पोहोचवायची होती, तेथील पत्ता, फोन क्रमांक ट्रकचालकाला देण्यात आला होता. मात्र, हा ट्रक हैद्राबादमध्ये नियोजित ठिकाणी पोहोचला नसल्याचे कळताच शिंदे यांनी स्वराज ट्रान्सपोर्टच्या मालकांकडे तक्रार केली.

त्यानंतर ते दोघेही ट्रकचालकाला फोन लावत होते; परंतु संपर्क होत नव्हता. अखेर शिंदे यांनी शहर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिल्यानंतर डीबीच्या पथकाने तपास केला. पोलिसांनी संशयिताला कर्नाटकमधून अटक करून त्याने लपवलेला ट्रक ताब्यात घेतला. पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, सहाय्यक फौजदार दशरथ कदम, हवालदार शिवाजी भिसे, गणेश घाडगे, संतोष भिसे, धीरज कुंभार, अभय साबळे, किशोर तारळकर, विशाल धुमाळ यांनी ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)