मुंबई – भ्रष्टाचाराच्या प्रकरणात एकटे किरीट सोमय्या हेच सामील नसून अन्यही भाजप नेत्यांची भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे आहेत. त्याची माहिती मला मिळाली असून येत्या काहीं दिवसांत एकूण 28 भाजप नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली जातील अशी घोषणा करून शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक नवीनच बॉम्ब टाकला आहे.
ते म्हणाले की चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या कंपन्यांकडून किरीट सोमय्या यांच्या प्रतिष्ठानाला कोट्यावधी रूपयांच्या देणग्या दिल्या गेल्या आहेत. हा भ्रष्टाचाराचाच पैसा आहे. त्याचीही ईडी मार्फत चौकशी करण्याची गरज आहे. देणग्यांच्या नावाखाली सोमय्या यांनी थेट खंडणी वसुलीच केली आहे असा आरोप त्यांनी आज पुन्हा एकदा केला.
आम्ही राज्य सरकार आणि त्यांच्या यंत्रणांकडे तक्रारी करून याच्या चौकशीची मागणी केली आहे असेही त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले की एकटे सोमय्याच नव्हे तर तब्बल 28 भाजप नेते भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकले असून त्यांची सारी प्रकरणे आपण बाहेर काढणार आहोत.
आपणच भ्रष्टाचार संपवण्याचे काम करीत आहोत असा दावा करणारे भाजपचे नेते स्वत:च भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकलेले असून त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्याचे काम आम्हाला करावे लागेल असेही त्यांनी म्हटले आहे.