पिंपरीत  दिवसभरात 2784 बाधित

  • उपचारादरम्यान 16 रुग्णांचा मृत्यू

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असून रोजच धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. गेल्या 24 तासांत पुन्हा तब्बल 2784 नव्या रुग्णांची भर पडल्याने बाधितांचा आकडा 1 लाख 58 हजार 768 इतका झाला आहे. तर गेल्या 24 तासांत 16 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

बुधवारच्या अहवालानुसार शहरातील 2784 जणांना करोनाची लागण झाली आहे. तर 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमधील तेराजण शहरातील रहिवाशी होते. तर शहराबाहेरील तिघांचा उपचार सुरू असताना गेल्या 24 तासांत मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील मृतांचा आकडा 2107 वर पोहोचला असून शहराबाहेरील 853 जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूच्या आकड्याने 2960 ची संख्या आज गाठली.
मृत्यू झालेल्यांमध्ये शहरातील सांगवी, थेरगाव, काळेवाडी, चिंचवड, वडमुखवाडी, पिंपरी, भोसरी, रहाटणी येथील 13 जणांचा समावेश आहे. तर महापालिका हद्दीबाहेरील हडपसर आणि पुणे येथील रहिवाशी असलेल्या दोघांचा आज दिवसभरात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत शहरातील 1 लाख 32 हजार 386 जण करोनामुक्त झाले असून शहराबाहेरील 9149 जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. आज दिवसभरात करोनाची कोणतीही लक्षणे न आढळल्यामुळे 2257 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर गेल्या दोन दिवसांतील 2740 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. आज नव्याने संशयित असलेल्या 8319 जणांची करोना चाचणी करण्यात आली आहे.

सक्रिय रुग्णसंख्या वाढली
पिंपरी-चिंचवड शहरातील बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली असताना सक्रिय रुग्ण संख्याही मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. सध्या शहरात 24 हजार 278 उपचाराधीन रुग्ण असून त्यापैकी 4113 जणांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. तर तब्बल 20 हजार 165 इतके रुग्ण गृह विलगीकरणामध्ये उपचार घेत आहेत.

जिल्हा रुग्णालयात 58 करोनाबाधित
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात 58 करोनाबाधित रुग्णांची बुधवारी (दि. 7) भर पडली. तर, 5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये 4 ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. बाधित रुग्ण हे पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरातील रहिवाशी आहेत. करोनामुक्त झालेल्या 7 रुग्णांना घरी सोडण्यात आले. हिंजवडी, वाकड, येरवडा, बारामती, थेरगाव, जुनी सांगवी या परिसरातील हे रुग्ण आहे. 4 पुरुष आणि 3 महिला रुग्णांचा त्यामध्ये समावेश आहे. धनकवडी, दापोडी, औंध, पिंपळे गुरव, माणगाव येथील 5 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यातील 2 रुग्णांचा मंगळवारी तर, 3 रुग्णांचा बुधवारी मृत्यू झाला. रुग्णालयात सध्या 70 जणांवर उपचार सुरू आहे. त्यातील 34 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण परिसरातील संशयित रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातून आत्तापर्यंत 1 हजार 5 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 1 हजार 235 रुग्णांना होम क्‍वॉरंटाइन केले आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.