80 उपद्रवी केंद्रांसाठी बैठी पथकेही नियुक्त
परीक्षा केंद्र परिसराचे होणार व्हिडीओ चित्रीकरण
पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावीच्या परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्यात 273 भरारी पथके तैनात केली आहेत. 80 उपद्रवी केंद्रांसाठी बैठी पथकेही नियुक्त केली आहेत. नाशिकमध्ये सर्वांत जास्त उपद्रवी केंद्रे आहेत.
राज्य मंडळातर्फे प्रसिद्ध व छपाई केलेले परीक्षेचे वेळापत्रकच ग्राह्य धरावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा व्हॉटसऍप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी स्षष्ट केले. विद्यार्थ्यांला दिलेल्या ऑनलाइन प्रवेशपत्रावर विषयासमोर दिनांक व सकाळ किंवा दुपार या सत्रांचा उल्लेख केला आहे.
परीक्षेसाठी नियमित विद्यार्थी 15 लाख 85 हजार 528 एवढे आहेत. रिपीटर विद्यार्थी 1 लाख 35 हजार 199 आहेत. राज्यातील 110 ट्रान्सजेन्डर विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. यात पुणे विभागात 18, नागपूर 12, औरंगाबाद 19, मुंबई 20, कोल्हापूर 4, अमरावती 6, नाशिक 22, लातूर 8, कोकणातील 1 याप्रमाणे विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
दिव्यांग विद्यार्थीही परीक्षेला बसणार आहेत. पुणे विभागातून 1131, नागपूर 1100, औरंगाबाद 909, मुंबई 2759, कोल्हापूर 769, अमरावती 817, नाशिक 658, लातूर 558, कोकणातील 344 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
परीक्षा केंद्राच्या परिसराचे व्हिडीओ चित्रीकरणही होणार आहे. उत्तरपत्रिका व पुरवण्या यांची अदलाबदल होवू नये यासाठी बारकोडची छपाई आहे. परीक्षा केंद्रात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याबाबत पूर्वीच सूचना दिल्या आहेत. मात्र, अद्यापही ग्रामीण भागात त्याची अंमलबजावणी झालेली दिसून येत नाही.
वैद्यकीयदृष्ट्या किंवा काही अपरिहार्य कारणास्तव प्रात्यक्षिक परीक्षेच्या कालावधीत एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेस प्रविष्ठ होता आले नाही तर त्यांना “आऊट ऑफ टर्न’ने परीक्षेस प्रविष्ठ होता येणार आहे. या परीक्षा 24 ते 26 मार्चला होणार आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जावू नये यासाठी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये होणार आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक विद्यार्थी परीक्षा देणार
पुणे विभागीय मंडळात 2 लाख 85 हजार 642 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. यात जिल्ह्यातून सर्वाधिक 1 लाख 39 हजार 928 विद्यार्थ्यांची नोंदणी आहे. यात मुले 76 हजार 145 तर, मुली 63 हजार 783 आहेत. अहमदनगर जिल्ह्यात 76 हजार 94 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून यात 44 हजार 256 मुले तर, 31 हजार 838 मुलींचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यात 69 हजार 620 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. यात 39 हजार 678 तर 29 हजार 942 मुलींचा समावेश आहे.