शिक्षण उपसंचालकांची 27 पदे रिक्‍तच

विधानसभा निवडणुकीनंतर पदोन्नतीद्वारे रिक्‍त पदे भरणार असल्याची माहिती

पुणे – राज्यात शिक्षण उपसंचालकांची 39 पदे मंजूर असून त्यातील केवळ 12 पदे भरण्यात आलेली आहे. आता तब्बल 27 पदे रिक्तच पडली असून या पदांचा अतिरिक्त कार्यभार इतर अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आलेला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पदोन्नतीने काही पदे भरण्यात येणार आहेत.

राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडील विविध कार्यालयातील शिक्षण उपसंचालकांची पदे खूप महत्त्वाची मानली जातात. शिक्षण आयुक्त कार्यालयात दोन, प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयातील एक, माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयातील एक, पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील एक याप्रमाणे पुण्यातील पाच शिक्षण उपसंचालकांची पदे रिक्तच राहिली आहेत. नागपूर, नाशिक, मुंबई या ठिकाणच्या विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण उपसंचालकांची पदेही रिक्तच आहेत.

बहुसंख्य जिल्ह्यांमधील शिक्षण उपसंचालकांची पदे रिक्त पडल्यामुळे त्या पदांवर प्रभारी अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहे. मात्र, यामुळे रखडलेली कामे सक्षमपणे पुढे नेण्यात पूर्णपणे अद्यापही यश मिळालेले नाही ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. या पदांसाठी पदोन्नत्याही देण्यात आलेल्या नाहीत.

महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा) गट-अ मधील शिक्षणाधिकारी व तत्सम या पदावर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण करण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तांनी शासनाकडे सादर केला होता. पायाभूत प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या व शासनाच्या प्रचलित धोरणानुसार परिविक्षाधीन कालावधीच्या अटींची पूर्तता करणाऱ्या अधिकाऱ्यांचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

राज्यातील हारुण अत्तार (पुणे), डॉ. सुभाष बोरसे (नाशिक), राजेश हजारे, संदीप संगवे (मुंबई), शिवलिंग पटवे (नागपूर) या पाच अधिकाऱ्यांचा परिविक्षाधीन कालावधी नुकताच पूर्ण झाला आहे. या अधिकाऱ्यांना वार्षिक वेतनवाढी देण्यात याव्यात व सेवापुस्तकातही त्याच्या नोंदी घेण्यात याव्यात, असे आदेश शालेय शिक्षण विभागाचे कार्यासन अधिकारी संतोष ममदापुरे यांनी जारी केले आहेत.

लॉटरी कोणाला लागणार?
यापूर्वी आठ अधिकाऱ्यांचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण झालेला आहे. यामुळे आता शिक्षण उपसंचालकांपदासाठी सुमारे 13 अधिकारी पात्र ठरणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर यातील काही अधिकाऱ्यांना शिक्षण उपसंचालक पदावर पदोन्नती मिळण्याची शक्‍यता वर्तविण्यात येऊ लागली आहे. यात कोणाची लॉटरी लागणार याबाबत उत्सुकता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.