शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये ३१ जुलैला ढगफुटी झाली. त्यामुळे मुसळधार पाऊस कोसळून ३ जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला. त्या पुरात काही जण वाहून गेले. त्यातील ५ जणांचे मृतदेह शुक्रवारी हाती लागले. त्यामुळे ढगफुटीत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २७ इतकी झाली आहे. शिमला, कुलू आणि मंडी या जिल्ह्यांना नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला.
ढगफुटी होऊन ९ दिवस उलटून गेल्यानंतरही जवळपास ३० जण बेपत्ता आहेत. त्यांच्या शोधासाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. ती सुमारे ८५ किलोमीटर क्षेत्रात सुरू आहे. लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफ, आयटीबीपी, सीआयएसएफ, पोलीस आणि गृहरक्षक दलाची पथके शोधमोहिमेत सहभागी झाली आहेत. त्या दलांचे ६६३ जवान अथकपणे शोधमोहीम राबवत आहेत.
विविध उपकरणे, ड्रोन, श्वान पथकांचीही मदत शोधकार्यासाठी घेतली जात आहे. हिमाचलमध्ये २७ जून ते ८ ऑगस्ट या कालावधीत पावसामुळे विविध दुर्घटना घडल्या. त्यामध्ये सुमारे १०० जण मृत्युमुखी पडले आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे त्या राज्यात ८०२ कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.