जामखेडमधील 27 चारा छावण्या बंद

शेतीच्या कामामुळे जनावरे परतू लागली

तब्बल 15 दिवसांनी पावसाची हजेरी

यंदा 7 जूनला येणारा पाऊस तब्बल 15 दिवसांनी उशिराने पडला. तालुक्‍यात पावसाने जोरदार हजेरी लावली. जामखेड तालुक्‍यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली. कृषी दुकानदारांकडे बी-बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे.

जामखेड – दुष्काळी परिस्थितीमुळे जामखेड तालुक्‍यात 67 चारा छावण्यांना जिल्हा प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली होती. जूनच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी शेतीच्या कामाकडे वळू लागला आहे. परिणामी छावण्यांमधील पशुधन घेऊन जात आहे. त्यामुळे तालुक्‍यातील 27 चारा छावण्या बंद झाल्या आहेत. बुधवार अखेर तालुक्‍यामध्ये 40 चारा छावण्या सुरू होत्या. या आठवड्यात पावसाचा जोर कायम राहिल्यास चारा छावण्यांची संख्या आणखी कमी होण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. गेल्यावर्षी पडलेल्या अल्प पावसामुळे खरीप व रब्बीचा हंगाम वाया गेला आहे.

दुष्काळामुळे जामखेड तालुक्‍यात तीव्र चाराटंचाई निर्माण झाल्यामुळे जनावरे जगविण्यासाठी शेतकऱ्यांपुढे संकट निर्माण झाले. तालुक्‍यातील 87 गावामधील व 59 ग्रामपंचायत क्षेत्रातील पशुपालकांकडे लहान मोठी पशुची एकूण संख्या 1 लाख 95 हजार इतकी आहे. यामध्ये गाय वर्ग व म्हैस वर्ग लहान मोठे मिळून एकूण संख्या 79 हजार 378 एवढी जनावरांची संख्या आहे. तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात पशुधन असून सांभाळण्याचे आव्हान शेतकऱ्यांपुढे आहे. तालुक्‍यात जनावरांना चारा-पाणी टंचाईचा समाना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पशुपालकांना चारा पाण्याअभावी पशुधन सांभाळणे अवघड झाल्याने बेभावाने विक्री करीत होते.

शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने चारा छावण्या सुरू करण्यासंबंधीची घोषणा केली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने जामखेड तालुक्‍यात 67 चारा छावण्यांना अटी व शर्तींसह मंजुरी देऊन पशुधन सांभाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे पशुधन सुरक्षित राहिले. जूनच्या तिसऱ्या आठवड्यात तालुकाभरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच काही ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाला तर काही ठिकाणी शेती कामासाठी शेतकऱ्यांनी चारा छावणीमधील जनावरे घेऊन जाण्यास पसंती दर्शवली आहे. जूनच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये तालुक्‍यातील एकूण 27 चारा छावण्या बंद झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. आता 40 छावण्या सुरू आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.