२७ फेब्रुवारी : तरुणाईच्या मनामनात बोलते का मराठी?

‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी’
कवीवर्य सुरेश भटांच्या या ओळी प्रत्येक मराठी भाषिकाच्या मनावर राज्य करतात. मातृभाषेचा अभिमानाने उर भरून यावा अशाच या ओळी आहेत.पण महासत्तेची भिस्त ज्या तरुणाईवर अवलंबून आहे त्या तरुणाई ला मराठी बद्दल किती आस्था ही मात्र चिंतेची बाब आहे.

बोलण्या-लिहिण्या-समजण्याच्या पातळीवर ही तरुणाई मराठीचा किती आग्रह करते..? की निव्वळ जन्मने मिळालेली भाषा म्हणून फक्त बोलायची म्हणून बोलली जाते याचा विचार व्हायला हवा. समाज माध्यमांच्या वारेमाप आहारी गेलेल्या तरुणाईची भाषा ही इंग्रजी आणि मराठी यांचे मिश्रण असलेली मिंग्रजी असावी असाच निष्कर्ष निघू शकतो अशी परिस्थिती आहे.दैनंदिन वापरात इतर भाषिक शब्दांच्या आक्रमनांनी मराठी भाषा दिवसेंदिवस घायाळ होत आहे.अनेक पारिभाषिक शब्द कालबाह्य होत आहेत,मराठीच्या समृद्ध बोलींबद्दल तरुण वर्गात फार माहितीचे वातावरण नाही शहरात तर हे प्रमाण नगण्यच.

इंग्रजी भाषेबद्दलचा अकारण हेवा, ती बोलता यावी साठीचा विनाकारण अट्टाहास यांमुळे मराठीवर एकअर्थाने अन्यायच होत आहे.एका बाजूला पटसंख्या कमी झाल्या कारणाने बंद पडत चाललेल्या मराठी माध्यमाच्या शाळा आणि दुसऱ्या बाजूला वाढीव शुल्क आकारूनही इंग्रजी माध्यमांच्या शाळेत आपल्या पाल्यांचा प्रवेश घेण्यासाठी आटापिटा करणारे पालक असे विरोधाभासी चित्र समाजात दिसत आहे.

मातृभाषेचा आग्रहच नसल्याने नवीन पिढी भाषिक वैभवाला मुकते आहे.भाषेतील गोडवा, त्यातून निर्माण होणारे नादमधुर्य या कोणत्याच गोष्टींशी तरुण पिढीला जवळीक वाटत नाही.आभासी जगाचा आसरा आणि इंग्रजी भाषेची जवळीक ही तर खूप मोठी आव्हाने आज मराठी भाषेपुढे उभी आहेत. मराठी भाषेच्या ज्ञात इतिहासातील आरंभ बिंदूपासून सुरू झालेला प्रवास स्थित्यंतरांच्या अनेक टप्प्यावर आडथळ्यांच्या अनेक शर्यती आणि समस्या व आव्हानांना तोंड देत आजतागायत सुरू आहे.

तो असाच अव्याहतपणे सुरू राहावा यासाठी तरुण पिढीला भाषेची जवळीक निर्माण होईल असे काही कृतीपूर्ण प्रयोग राबवावे लागतील.मराठीचा वृथा अभिमान बाजूला सारून तिच्या जतन संवर्धनासाठी सर्व स्थरावर जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवेत. मग येईल मराठी भाषेला ‘अच्छे दिन’….

ग्रामीण भागातून पुण्यात शिक्षणासाठी आलो तेव्हा भाषेबद्दल खूप अडचणी वाटल्या. प्रमाण भाषा आणि गावाकडची बोली यातली दरी प्रचंड मोठी वाटत होती. बोलताना शरमल्या सारखं व्हायचं. वाटत असूनही काही वेळेस व्यक्त होता येत नव्हतं.औषधाच्या दुकानात जा किंवा भाजीपाल्याच्या तोडकी मोडकी मराठी हिंदीत मिसळून बोलायचो पण त्याची सुद्धा लाज वाटायची.आता मात्र वर्तमानपत्र किंवा पुस्तकांच्या मदतीने हे सरावाचं करून घेतलं.प्रमाण भाषा आणि उच्चार याबद्दल प्राथमिक यत्ते पासून जागरूकता निर्माण व्हायला हवी. -सौरभ चेचरे(वृत्तपत्र विद्या पदविका, रानडे इन्स्टिट्यूट)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.