दाखल झाले होते तब्बल 85 अर्ज
पुणे – सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल झालेल्या पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील तब्बल 27 उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहे. दरम्यान, या मतदारसंघात आता 58 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यात प्रमुख राजकीय पक्षांसह बंडखोरी केलेले सर्व उमेदवार तसेच अपक्षांचाही समावेश आहे.
कॅन्टोन्मेंट मतदारसंघात तब्बल 78 उमेदवारांनी 81 अर्ज दाखल केले. त्यामुळे या मतदारासंघात एकूण 85 उमेदवारांचे तब्बल 89 अर्ज दाखल झाले होते. यांची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी नीता शिंदे यांच्यासमोर झाली. यावेळी सुमारे 27 उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले. यावेळी उमेदवार तसेच त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी इतर पक्षांच्या उमेदवारांबाबतही फारसे आक्षेप घेण्यात आले नाहीत. तर बाद झालेले अर्ज प्रामुख्याने अर्धवट माहिती, स्वाक्षरी नसणे अशा कारणांमुळे बाद झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, सोमवारपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. सोमवारी दुपारी 3 नंतर निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे.
58 उमेदवारांसाठी लागू शकतात 4 ईव्हीएम
कॅन्टोन्मेंट मतदारसंघात सर्वाधिक अर्ज आल्याने मतदानासाठी ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपर वापरले जाण्याची अफवा पसरली होती. त्यासाठीच हे उमेदवार उभे केल्याचे पसरविले जात होते. मात्र, प्रत्यक्षात एका केंद्रात तब्बल 144 उमेदरावांसाठी 9 मशिन लावण्याची सुविधा असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. तर, या मतदारसंघात आता 58 उमेदवार असून एवढेच उमेदवार कायम राहिले तरी, एका ईव्हीएमवर 16 उमेदवारांची नावे बसत असल्याने येथे जास्तीत जास्त 4 मशिन लागतील. त्यामुळे किती उमेदवार असल्यानंतर निवडणूक बॅलेट पेपरवर होईल, ही केवळ अफवाच असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी “प्रभात’शी बोलताना स्पष्ट केले.