गुवाहाटी -राजकीयदृष्ट्या असणारे महत्त्व आणि लोकसंख्येचा विचार करता भारतातील छोट्या राज्यांमध्ये आसामचा समावेश होतो. तसे असले तरी श्रीमंत उमेदवारांबाबत ते राज्य इतरांच्या फार मागे नसल्याचे सूचित होत आहे. आसाममध्ये तब्बल 264 करोडपती विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
आसाममध्ये विधानसभेच्या एकूण 126 जागा आहेत. त्या जागांवर मिळून 946 उमेदवार नशीब आजमावत आहेत. त्यातील जवळपास 28 टक्के उमेदवारांची मालमत्ता कोटींच्या घरात आहे. आसाममधील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या कॉंग्रेसकडे सर्वांधिक 64 श्रीमंत उमेदवार आहेत. त्याखालोखाल सत्तारूढ भाजपने 60 करोडपतींना रिंगणात उतरवले आहे. युनायटेड पीपल्स पार्टी, लिबरल (यूपीपीएल) या पक्षाचे मनरंजन ब्रह्मा हे आसाममधील सर्वांत श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. ते 268 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत.
आसाममधील मंत्र्यांचा विचार करता नबाकुमार डॉली यांच्याकडे सर्वांधिक 25 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. त्याखालोखाल हिमंता बिस्वासर्मा हे श्रीमंत मंत्री ठरले आहेत. त्यांच्या नावे 17 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. तर, मुख्यमंत्री सर्वांनद सोनोवाल हे 3 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे धनी आहेत.