कोल्हापूर जिल्ह्यात 262 गावे पूरबाधित; 40 हजार लोक स्थलांतरित

कोल्हापूर  – कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तीन दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे एकूण 262 गावे पूरबाधित बनली आहेत. त्यामध्ये 34 गावे पूर्णत: तर 228 गावे अंशत: बाधित आहेत. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 9917 कुटुंबे स्थलांतरित झाले आहेत.

आतापर्यत स्थलांतरित व्यक्तींची संख्या 40 हजार 882 इतकी झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीच्या कालावधीत पाच व्यक्ती मयत झाल्या आहेत. राधानगरी व चंदगड तालुक्‍यातील प्रत्येकी दोन तर कागलमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात एनडीआरएफच्या तीन टीम कार्यरत आहेत. यापैकी शिरोळ तालुक्‍यात एक व करवीर तालुक्‍यात दोन टीम सक्रिय आहेत. त्यांना स्थानिक प्रशासनाची साथ आहे. शिवाय सेवाभावी संस्था आणि सार्वजनिक तरुण मंडळाच्या कार्यकर्तेही मदत कार्यात आहेत. स्थलांतरित जनावरांची संख्या 15 हजार 296 आहे. शेती, व्यापार व पशुधनाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.

पावसामुळे 10 राज्यमार्गांची वाहतूक खंडीत झोली आहे. प्रमुख जिल्हा मार्ग 29, इतर जिल्हा मार्ग 10 आणि ग्रामीण मार्ग 18 खंडीत झाले आहे. जिल्ह्यातील स्थलांरित लोकांसाठी निवारागृहे सुरू केली आहेत. तहसिलदार व दानशूर व्यक्ती, संस्था, कारखाना व्यवस्थापन यांनी पूरबाधित लोकांसाठी निवारागृहाची व्यवस्था केली आहे.

कोल्हापूर शहरात 1019 नागरिकांचे स्थलांतर
महापालिकेतर्फे शहरातील 1019 नागरिकांचे स्थलांतर केले. रामानंदनगर येथील 40 लोक, शुक्रवारपेठ, पंचगंगा तालीम परिसर, सिध्दर्थनगर या परिसरातील 74 कुटुंबांतील 312 नागरिकांचा समावेश आहे.

शाहुपूरी कुंभार गल्ली, सुतारवाडा, रिलायन्स मॉल जवळील 68 कुटुंबातील 255 जणांचे स्थलांतर केले आहे. न्यू पॅलेस, रमणमळा परिसर, रेणुका मंदिर, त्रिंबोली नगर, सनसिटी, महावीर कॉलेज पिछाडी, पोलो ग्राऊंड, जावडेकर अपा. ड्रिम वर्ल्ड, मुक्त सैनिक वसाहत येथील 135 कुटुंबातील 320 नागरिकांचे स्थलांतर केले आहे. शाळा, कॉलेज, समाजमंदिर, होस्टेल येथे व्यवस्था केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.