262 वाहन चालकांचे परवाने निलंबित

पिंपरी -वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवणाऱ्या 262 वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. या वाहन चालकांचे वाहन परवाने निलंबित करण्यात आले असून अवघ्या दीड महिन्यात वाहतूक पोलिसांच्या विशेष मोहिमे अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीअंतर्गत अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या अपघातांमध्ये विशेषतः दुचाकीस्वार आणि पादचारी यांच्या मृत्यूंचे प्रमाण अधिक आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहने चालवणाऱ्या चालकांमुळे सर्वाधिक अपघात होत आहेत. यामुळे नागरिकांचा नाहक बळी जात आहे. बेशिस्त वाहन चालकांवर वचक बसावा व अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाने कठोर कारवाई सुरू केली आहे. 1 जानेवारी ते 22 फेब्रुवारी या कालावधीत 262 वाहन चालकांचे वाहन परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन न करण्याबाबत वाहन चालकांना शिस्त लागावी यासाठी विशेष अभियान सुरू आहे. सुरुवातीला नियमभंग करणाऱ्या चालकांचा परवाना निलंबित करण्यात येतो. परवाना निलंबित करूनही चालकाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले. तर संबंधित चालकावर परवाना रद्दची देखील कारवाई होऊ शकते. त्यानंतर, संबंधित चालकाला कोणतेही वाहन चालवण्याची परवानगी मिळणार नाही. सध्या सुरुवातीच्या टप्प्यातील कारवाई सुरू आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.